Bhandara News : भंडाऱ्यात महाप्रसादातून विषबाधा; २०० जणांची प्रकृती खालावली
Bhandara News : लाखनी तालुक्यातील खराशी गावातील घटना; आरोग्य विभागाकडून गावातच वैद्यकीय शिबिर
Bhandara News : भंडारा: लाखनी तालुक्यातील खराशी गावात भंडाऱ्याचा महाप्रसाद खाल्ल्यानंतर १५० ते २०० नागरिकांची प्रकृती खालावली. नागरिकांना उलट्या, मळमळ आणि जुलाबाचा त्रास सुरू झाल्याने उपचारासाठी रुग्णालयांमध्ये गर्दी झाली. एकाच वेळी मोठ्या संख्येने नागरिक आजारी पडल्याने आरोग्य विभागाने गावातच विशेष वैद्यकीय शिबिर सुरू केले आहे.https://maharashtramirror.com/ Bhandara News
खराशी गावात आयोजित एका कार्यक्रमानंतर नागरिकांनी महाप्रसाद ग्रहण केला होता. त्यानंतर काही वेळाने तसेच सकाळच्या सुमारास अनेकांना उलट्या, मळमळ आणि जुलाबाचा त्रास जाणवू लागला. एकामागोमाग नागरिकांची प्रकृती बिघडू लागल्याने गावात चिंता निर्माण झाली. त्रास वाढल्यानंतर बाधित नागरिकांनी सकाळपासून परिसरातील ग्रामीण तसेच खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी धाव घेतली. एकाच वेळी मोठ्या संख्येने रुग्ण दाखल झाल्याने रुग्णालयांमध्ये गर्दी झाली असून वैद्यकीय पथकांकडून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासन आणि आरोग्य विभागाने तातडीने उपाययोजना सुरू केल्या. नागरिकांना गावातच उपचार उपलब्ध व्हावेत यासाठी खराशी येथे विशेष वैद्यकीय शिबिर उभारण्यात आले आहे. वैद्यकीय पथकांकडून नागरिकांची तपासणी करून आवश्यक उपचार केले जात आहेत.
सध्या बाधित नागरिक वैद्यकीय निगराणीखाली आहेत. विषबाधा नेमकी कोणत्या खाद्यपदार्थामुळे झाली, याबाबत दिलेल्या प्राथमिक माहितीत स्पष्टता नसल्याने वैद्यकीय तपासणीनंतरच त्याचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.



