आरोग्यपुणेमहाराष्ट्र

PCMC : शौचालयांमध्ये परिवर्तन; पीसीएमसीच्या नव्या धोरणाला स्थायी समितीची मंजुरी

pcmc : शहरात स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार सार्वजनिक शौचालयांसाठी महत्त्वाचे पाऊल

PCMC : महिला, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक आणि तृतीयपंथींसाठी स्वतंत्र सुविधा; डिजिटल मॅपिंग, तक्रार निवारण यंत्रणा आणि पीपीपी मॉडेलवर भर

PCMC : पिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आणि नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित व दर्जेदार सार्वजनिक शौचालय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने (पीसीएमसी) सर्वसमावेशक सार्वजनिक शौचालय धोरण तयार केले आहे. या धोरणाला गुरुवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत अध्यक्ष अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली मंजुरी देण्यात आली. अंतिम मंजुरीसाठी हा प्रस्ताव आता सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्यात येणार आहे.

PMC News : पर्यावरणीय पायाभूत सुविधांचे बळटीकरण

शहरातील वाढते शहरीकरण, वेगाने वाढणारी लोकसंख्या आणि सार्वजनिक स्वच्छता सुविधांची वाढती गरज लक्षात घेऊन हे धोरण तयार करण्यात आले आहे. सार्वजनिक व सामुदायिक शौचालयांची संख्या वाढविणे, त्यांचे नियमित व्यवस्थापन व देखभाल सुनिश्चित करणे तसेच उघड्यावर शौचास जाण्याच्या प्रथेला आळा घालून शहरातील स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्याचा दर्जा उंचावणे हा या धोरणाचा मुख्य उद्देश आहे. PCMC

महापालिकेने शहरातील बाजारपेठा, बसस्थानके, वाहतूक केंद्रे, उद्याने, धार्मिक स्थळे, झोपडपट्ट्या, दाट लोकवस्तीचे भाग, प्रमुख रस्ते आणि इतर वर्दळीच्या परिसरांतील विद्यमान सार्वजनिक शौचालयांचा सविस्तर अभ्यास केला आहे. लोकसंख्या, नागरिकांची ये-जा आणि भविष्यातील गरजा लक्षात घेऊन आवश्यकतेचे मूल्यांकन करण्यात आले असून त्याआधारे धोरणाची आखणी करण्यात आली आहे.PCMC

या धोरणाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे सर्वसमावेशकतेवर दिलेला भर. महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती आणि तृतीयपंथी नागरिकांसाठी स्वतंत्र व सुलभ शौचालय सुविधा उपलब्ध करून देण्याची तरतूद करण्यात आली आहे. दिव्यांगांसाठी सहज वापरता येतील अशा रॅम्प, रेलिंग आणि प्रशस्त जागा उपलब्ध करून देण्याबरोबरच माता व बालकांसाठी स्वतंत्र सुविधा विकसित करण्याचाही प्रस्ताव आहे.PCMC

सार्वजनिक शौचालयांच्या नियोजन, बांधकाम, संचालन आणि देखभालीसाठी स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वेही निश्चित करण्यात आली आहेत. शौचालयांमध्ये अखंड पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, पुरेशी वीज व प्रकाश व्यवस्था, नियमित स्वच्छता, सुरक्षितता आणि वेळोवेळी दुरुस्ती यावर विशेष भर देण्यात आला आहे. यामुळे शौचालये केवळ उभारली जाणार नसून ती सातत्याने स्वच्छ आणि वापरण्यायोग्य राहतील, याची खात्री केली जाणार आहे.

FDA : पुण्यातील पेठांमध्ये धडक कारवाई; ५५ लाखांचा निकृष्ट अन्नसाठा जप्त, ५ हॉटेल्सचे परवाने निलंबित

महापालिकेने सार्वजनिक शौचालयांच्या व्यवस्थापनात तंत्रज्ञानाचा वापर करण्यालाही प्राधान्य दिले आहे. शहरातील सर्व सार्वजनिक शौचालयांचे डिजिटल मॅपिंग करण्यात येणार असून, नागरिकांना मोबाईल किंवा इतर माध्यमातून जवळचे शौचालय सहज शोधता येईल. तसेच शौचालयांबाबतच्या तक्रारींचे जलद निवारण करण्यासाठी प्रभावी तक्रार निवारण यंत्रणा आणि आधुनिक देखभाल व्यवस्थापन प्रणाली विकसित करण्यात येणार आहे. त्यामुळे स्वच्छता आणि देखभालीवर सातत्याने देखरेख ठेवणे शक्य होणार आहे.PCMC

FDA : शाळेच्या आवारात जंक फूडला सक्त बंदी; अन्न व औषध प्रशासनाचा मोठा निर्णय

धोरणामध्ये गरजेनुसार सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) मॉडेलचाही अवलंब करण्यात येणार आहे. या माध्यमातून सार्वजनिक शौचालयांचे संचालन व देखभाल अधिक कार्यक्षम पद्धतीने करता येईल. खाजगी सहभागामुळे सुविधांची गुणवत्ता, स्वच्छता आणि नियमित देखभाल अधिक प्रभावीपणे होण्यास मदत होईल, असा महापालिकेचा विश्वास आहे.

स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे यांनी सांगितले की, “शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या स्वच्छतेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी हे धोरण महत्त्वपूर्ण मार्गदर्शक ठरेल. प्रत्येक नागरिकाला स्वच्छ, सुरक्षित आणि सुलभ सार्वजनिक शौचालय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका कटिबद्ध असून, या धोरणामुळे शहरातील सार्वजनिक स्वच्छता व्यवस्थेत सकारात्मक आणि दीर्घकालीन बदल घडून येतील.” PCMC

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button