मुंबई

Ramzan Eid : ईद-उल-फित्र म्हणजे काय? सविस्तर माहिती

•ईद-उल-फित्र म्हणजे काय?

मुंबई :- मुस्लीम धर्मीयांमध्ये ईद हा सण अत्यंत पवित्र मानला जातो. रमजान ईद मुस्लीम धर्मींयांचा सर्वात मोठा सण म्हणूनही ओळखला जातो.रमजान महिन्याच्या शेवटच्या दिवशी ईद-उल-फित्र साजरी केली जाते. रमजान महिना म्हणजे प्रार्थना आणि रोजा (उपवास) करण्याचा महिना.ईद-उल-फित्र याचं शब्दशः भाषांतर करायचं झाल्यास उपवास सोडताना साजरा केला जाणारा सण असं करता येऊ शकेल.

ईदच्या दिवशी मुस्लीम नवे कपडे घालून मशिदीत जातात. शिरखुर्मासारखे गोड पदार्थ घरात बनवले जातात.ईदची नमाज अदा करण्यापूर्वी गरिबांना दान स्वरुपात काहीतरी देण्याची परंपरा आहे. या दानाला ‘जकात’ असं संबोधलं जातं. प्रत्येक मुस्लीम व्यक्ती ही ‘जकात’ देऊन नमाज पठण करण्यास जाते.

नमाजानंतर परतताच मित्र-नातेवाईकांसोबत जेवणावर यथेच्छ ताव मारला जातो. एकमेकांना भेटवस्तू, पैसे दिले जातात. याला ईदी असं म्हटलं जातं. जगभरातील अनेक देशांमध्ये ईदला सार्वजनिक सुटी असते.

रमजान म्हणजे काय?

रमजान हे एक अरेबिक नाव आहे. इस्लामिक कॅलेंडरमधील नवव्या महिन्याला रमजान महिना म्हणून ओळखलं जातं. मुस्लीम धर्मियांसाठी हा अत्यंत पवित्र महिना आहे.मुस्लीम धर्मातील पाच मूळ तत्त्वांपैकी एक म्हणूनही रमजान महिना ओळखला जातो. प्रत्येक मुस्लीम व्यक्तीला ही पाच मूळ तत्त्वं पाळावीच लागतात. अल्लाहने तसा आदेश दिला आहे, असंही म्हटलं जातं.

रमजान महिन्यातच पवित्र कुराण या ग्रंथाचे सुरुवातीची वचनं लिहिली गेली, अशी मुस्लीम धर्मीयांमध्ये मान्यता आहे. त्यामुळेच या काळात कुराण पठण करण्यावर अधिक भर दिला जातो.

शिवाय, रोजा करणं हा प्रार्थना करण्याचा, अल्लाहच्या जवळ जाण्यासाठीचा एक मार्ग असल्याची मुस्लीम बांधव मानतात. आरोग्य आणि स्वयंशिस्त उत्तम राहण्यासाठीही रोजा करणं चांगलं असल्याचं म्हटलं आहे.

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button