Mumbai News : मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा होणारच; ‘परिपत्रक’ बनावट असल्याचा खुलासा

• 14 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
मुंबई :- मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्रातील परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे एक बनावट परिपत्रक समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाले आहे. मात्र, हे परिपत्रक पूर्णतः खोटे असून, विद्यापीठाने असे कोणतेही परिपत्रक जारी केलेले नाही. त्यामुळे 14 ऑक्टोबर 2025 पासून सुरू होणाऱ्या सर्व परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होणार असल्याची माहिती विद्यापीठाने दिली आहे.विद्यापीठ प्रशासनाने सर्व विद्यार्थी आणि संबंधितांना आवाहन केले आहे की, त्यांनी या अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नये.
कोणत्या परीक्षा नियोजित वेळेवर?
14 ऑक्टोबरपासून तृतीय वर्ष सत्र 5 च्या महत्त्वाच्या परीक्षा सुरू होत आहेत. यात प्रामुख्याने तृतीय वर्ष बी.कॉम., बीएमएस, बी.कॉम.च्या ‘अकाउंटिंग अँड फायनान्स’, ‘बँकिंग अँड इन्श्युरन्स’, ‘फायनान्शिअल मार्केट’ यासह विविध शाखांच्या परीक्षांचा समावेश आहे.परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. पूजा रौंदळे यांनी सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी याची नोंद घेऊन परीक्षेची तयारी करावी, असे स्पष्ट केले आहे.



