Pune News : रुबी हॉल क्लिनिकविरुद्ध फौजदारी गुन्हा
महत्वाचे मुद्दे
4 मिनिट वाचन

Pune News : ९ वर्षांच्या मुलीच्या मृत्यूस वैद्यकीय तज्ज्ञ समितीला निष्काळजीपणाचे प्रथमदर्शनी पुरावे आढळले; न्यायालयाकडून रुग्णालय व्यवस्थापन आणि डॉक्टरांना समन्स जारी
महत्वाचे मुद्दे
पुणे, धनश्री ओतारी
पुण्यातील नामांकित रुबी हॉल हॉस्पिटल चर्चेत आले आहे. या हॉस्पिटलमध्ये एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर प्रकार समोर आला आहे. ९ वर्षांची मुलगी रिया रोहन लोबो हिच्या मृत्यूप्रकरणी रुबी हॉल क्लिनिकविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
कथित वैद्यकीय निष्काळजीपणाची गंभीर दखल घेत पुण्यातील न्यायदंडाधिकारी न्यायालयाने खाजगी फौजदारी तक्रारीवरून नियमित फौजदारी खटला नोंदवण्याचे निर्देश दिले आहेत. याप्रकरणी रुबी हॉल क्लिनिकचे शीर्ष व्यवस्थापन आणि डॉक्टरांना न्यायालयात हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले आहे.
पुण्यातील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी (समृद्ध पी. नार्वेकर यांच्या न्यायालयाने नील लोबो विरुद्ध परवेज ग्रँट आणि इतर या प्रकरणात १९ सप्टेंबर रोजी हा आदेश दिला. न्यायालयाने सर्व आरोपींना १९ ऑक्टोबर २०२६ रोजी न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.
ही फौजदारी तक्रार रियाचे काका सुनील सॅव्हियो लोबो आणि नील लोबो यांनी ॲडव्होकेट आशुतोष श्रीवास्तव यांच्यामार्फत दाखल केली आहे. २७ डिसेंबर २०२१ ते ९ जानेवारी २०२२ दरम्यान रुबी हॉल क्लिनिकच्या वानवडी आणि ससून रोड अशा दोन्ही शाखांमध्ये रियावर झालेल्या उपचारात अत्यंत निष्काळजीपणा, पायाभूत सुविधांची कमतरता आणि प्रशासकीय चुका झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
न्यायासाठी चार वर्षांचा लढा
२०२२ मध्ये दाखल करण्यात आलेल्या या तक्रारीनंतर कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली होती. तक्रार दाखल झाल्यानंतर, दंड प्रक्रिया संहिता १९७३ च्या कलम २०० अंतर्गत तक्रारदाराची शपथेवर जबानी नोंदवण्यात आली. त्यानंतर कलम २०२ अंतर्गत कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यामार्फत प्राथमिक चौकशी करण्यात आली.
पोलीस तपासात २२ एप्रिल २०२६ रोजी महत्त्वाचे वळण आले, जेव्हा पोलिसांनी उपचाराशी संबंधित सर्व वैद्यकीय कागदपत्रे ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या तज्ज्ञ समितीकडे अभिप्रायासाठी पाठवली. तज्ज्ञ समितीने ४ मार्च २०२६ रोजी दिलेल्या अहवालात डॉ. वैभव मेश्राम यांनी केलेल्या उपचारात प्रथमदर्शनी वैद्यकीय निष्काळजीपणा झाल्याचे नमूद केले.
या सर्व बाबींची नोंद घेत न्यायदंडाधिकारी नार्वेकर यांनी स्पष्ट केले की, ही तक्रार कायद्यानुसार मुदतीत दाखल केली असून, रेकॉर्डवरील कागदपत्रांवरून आरोपींविरुद्ध फौजदारी कारवाई सुरू करण्यासाठी पुरेसे आधार उपलब्ध आहेत. न्यायालयाने भारतीय दंड संहिता १८६० च्या कलमांतर्गत या प्रकरणाची नोंद घेण्यात आली आहे.
या प्रकरणात रुग्णालयाचे व्यवस्थापन, वैद्यकीय आणि नर्सिंग प्रशासन, तसेच उपचाराशी संबंधित डॉक्टरांचा आरोपी म्हणून समावेश आहे.
ऑक्सिजन पुरवठा खंडित आणि उपचारातील विलंबाचे आरोप
वानवडी येथील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल असताना ९ वर्षांच्या रियावर झालेल्या उपचारांवर या तक्रारीत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
न्यायालयातील कागदपत्रांनुसार, ३० डिसेंबर २०२१ रोजी झालेल्या सीटी स्कॅन रिपोर्टमध्ये रियाला 'ॲक्युरेट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम' (ARDS) किंवा 'पल्मोनरी एडेमा' (फुफ्फुसात पाणी होणे) असण्याची चिन्हे दिसून आली होती. हे गंभीर संकेत असूनही, डॉक्टरांनी बॅक्टेरियल इन्फेक्शनचा संशय धरूनच उपचार सुरू ठेवले आणि वेळेवर व्हेंटिलेटर सपोर्ट दिला नाही, असा आरोप तक्रारीत आहे.
७ जानेवारी २०२२ रोजी कुटुंबीयांनी स्वतःहून दुसऱ्या डॉक्टरचा सल्ला घेतल्यानंतर व्हेंटिलेटर लावण्याची शिफारस करण्यात आली. त्याच दिवशी रात्री रियाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आणि ८ जानेवारी रोजी ससून रोडवरील रुबी हॉल क्लिनिकच्या मुख्य शाखेत हलवण्यात आले, जिथे बालकांसाठी अतिदक्षता विभाग (PICU) उपलब्ध होता.
नेमकी घटना काय?
२७ डिसेंबर २०२१: रिया लोबोला रुबी हॉल क्लिनिक, वानवडी येथे दाखल करण्यात आले.
३० डिसेंबर २०२१: सीटी स्कॅनमध्ये ARDS / फुफ्फुसात पाणी झाल्याचे संकेत; तरीही बॅक्टेरियल इन्फेक्शनचे उपचार सुरू.
६ जानेवारी २०२२: वॉर्डमध्ये ऑक्सिजन गळतीची घटना घडल्याचा आरोप.
७ जानेवारी २०२२: ऑक्सिजन पुरवठा अचानक बंद पडल्याचा आरोप. बाहेरील डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर व्हेंटिलेटर सुरू.
८ जानेवारी २०२२: रुग्णाला पीआयसीयू उपचारासाठी ससून रोडच्या मुख्य शाखेत हलवले.
९ जानेवारी २०२२: उपचारादरम्यान ९ वर्षांच्या रिया लोबोचा मृत्यू.
वानवडी शाखेत ६ जानेवारी २०२२ रोजी ऑक्सिजन गळती झाली होती आणि ७ जानेवारी रोजी ऑक्सिजनचा पुरवठा पूर्णपणे खंडित झाला होता, असाही गंभीर आरोप कुटुंबाने केला आहे. या ऑक्सिजन पुरवठ्यातील बिघाडाबाबत कुटुंबीयांनी वारंवार अहवाल मागितला, परंतु रुग्णालयाकडून कोणताही स्पष्ट प्रतिसाद मिळाला नाही.
तक्रारदारांचे वकील ॲडव्होकेट आशुतोष श्रीवास्तव यांनी न्यायालयाच्या या आदेशाचे स्वागत करत न्यायाच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे म्हटले आहे.
"माध्यमांशी बोलताना ॲड. आशुतोष श्रीवास्तव म्हणाले, 'विद्वान न्यायदंडाधिकाऱ्यांनी शपथेवरील पडताळणी आणि रेकॉर्डवरील कागदपत्रांचा विचार करून आरोपींविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरेसे प्रथमदर्शनी पुरावे मानले आहेत. या आदेशामुळे तक्रारदारांना नियमित फौजदारी खटल्यात आपले पुरावे मांडण्याची संधी मिळणार आहे. रियाला दिलेले उपचार आणि तिच्या मृत्यूच्या परिस्थितीची निष्पक्ष न्यायिक चौकशी व्हावी हीच कुटुंबाची मागणी आहे. त्यांचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे.'"
दुसरीकडे, न्यायालयाचे समन्स आणि १९ ऑक्टोबरच्या सुनावणीबाबत रुबी हॉल क्लिनिकच्या कायदेशीर सल्लागार मंजुषा कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, "आम्हाला या प्रकरणाची कोणतीही माहिती नाही. आजपर्यंत आम्हाला न्यायालयाचे कोणतेही समन्स मिळालेले नाही."
न्यायालयाने खटला नोंदवण्याचे आदेश दिल्याने, आता पुढील महिन्यात १९ ऑक्टोबर रोजी सर्व आरोपींना न्यायालयात उपस्थित राहून आपली बाजू मांडावी लागणार आहे.




