PUNE Chain Snatching : चोरीच्या गाड्या वापरून चेन स्नॅचिंग करणारे दोन सराईत गुन्हेगार गजाआड
पुणे: पुण्यातील आंबेगाव परिसरात चोरीच्या दुचाकींचा वापर करून जबरी चोरी आणि चेन स्नॅचिंग करणाऱ्या दोन सराईत आरोपींना आंबेगाव पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने अत्यंत शिताफीने अटक केली आहे.
2 मिनिट वाचन

आंबेगाव पोलिसांची धडक कारवाई; ३ चोरीच्या दुचाकी आणि १० ग्रॅम सोन्याचे गंठण असा एकूण २ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Understanding Chain Snatching
पुणे: पुण्यातील आंबेगाव परिसरात चोरीच्या दुचाकींचा वापर करून जबरी चोरी आणि चेन स्नॅचिंग करणाऱ्या दोन सराईत आरोपींना आंबेगाव पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने अत्यंत शिताफीने अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी आरोपींकडून ३ चोरीच्या दुचाकी आणि १० ग्रॅम सोन्याचे मिनी गंठण असा एकूण २ लाख ४० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
घटनेचा पार्श्वभूमी
१३ मे २०२६ रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास, दत्तनगर परिसरातून एक नागरिक पायी घराकडे जात असताना, एका काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी इसमांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मिनी गंठण जबरदस्तीने हिसकावून पळ काढला होता. या प्रकरणी आंबेगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३०९ (४) आणि ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अशी झाली अटक
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने परिसरातील सुमारे २०० ते २५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. यादरम्यान पोलीस अंमलदार धनाजी धोत्रे, सचिन गाडे, ज्ञानेश्वर चित्ते व प्रमोद भोसले यांना हे आरोपी सासवड परिसरात असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस उप-निरीक्षक युवराज शिंदे आणि त्यांच्या पथकाने सासवडमध्ये सापळा रचून रोहित राजू माने (वय २०, रा. सासवड) आणि ओमकार विकास नाईक (वय २२, रा. वडकी) या दोघांना ताब्यात घेतले. सखोल चौकशीत त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली.
वरिष्ठांचे मार्गदर्शन व कौतुक:
सदरची उत्कृष्ट कामगिरी पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपआयुक्त मिलिंद मोहिते आणि सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) चांगदेव सजगणे, उपनिरीक्षक युवराज शिंदे व त्यांच्या संपूर्ण तपास पथकाने केली आहे.
पोलीस अंमलदार चेतन गोरे, हणमंत मासाळ, हरीश गायकवाड, निलेश जमदाडे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, ज्ञानेश्वर चित्ते, प्रमोद भोसले, नितीन कातुर्डे, शिवाजी पाटोळे, फिरोज शेख, अजय कामठे, सुभाष मोरे, योगेश जगदाळे, राकेश टेकवडे, आणि अवधूत जमदाडे यांनी या कामगिरीत भाग घेतला.
आरोपींकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून, पोलीस उपनिरीक्षक युवराज शिंदे पुढील तपास करत आहेत.
चोरीच्या गाड्या वापरून चेन स्नॅचिंग करणारे दोन सराईत गुन्हेगार गजाआड
Two Habitual Criminals Arrested for Chain Snatching Using Stolen Vehicles




