Ahilyanagar Municipal Budget : शिवद्रोही श्रीपाद छिंदमची महापालिका सभागृहात गचांडी! नगरसेवकांनी दिला बाहेरचा रस्ता
Ahilyanagar Budget Session : छत्रपतींच्या अपमानाचा वणवा पेटला; भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सदस्यांनी एकत्र येत सभागृहातून हाकलले
2 मिनिट वाचन

Ahilyanagar Budget Session : छत्रपतींच्या अपमानाचा वणवा पेटला; भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सदस्यांनी एकत्र येत सभागृहातून हाकलले
अहमदनगर :- छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल 2018 मध्ये अपशब्द काढल्याचा डाग कपाळावर असलेल्या श्रीपाद छिंदम याला आज अहमदनगर महापालिकेच्या अंदाजपत्रकीय सभेत अभूतपूर्व रोषाला सामोरे जावे लागले. सत्ताधारी राष्ट्रवादी (अजित पवार गट), भाजप आणि विरोधी शिवसेना (शिंदे गट) या सर्व पक्षांच्या नगरसेवकांनी पक्षीय भेद विसरून 'शिवद्रोही' छिंदमला सभागृहातून अक्षरशः बाहेर काढले. "ज्याने महाराजांचा अपमान केला, त्याला लोकशाहीच्या मंदिरात बसण्याचा अधिकार नाही," अशा गर्जनांनी संपूर्ण सभागृह दणाणून गेले होते.
अंदाजपत्रकीय सभेत वादाची ठिणगी
महापौर ज्योती गाडे यांच्या अध्यक्षतेखाली आज महापालिकेची विशेष अंदाजपत्रकीय सभा सुरू होती. चर्चेदरम्यान श्रीपाद छिंदम याने अंदाजपत्रकाच्या तांत्रिक बाबींवरून प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली. मात्र, तो बोलण्यासाठी उभा राहताच सर्वपक्षीय नगरसेवक आक्रमक झाले. "शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्याला आम्ही बोलू देणार नाही," असा पवित्रा घेत नगरसेवकांनी महापौरांसमोर ठिय्या दिला.
माईक हिसकावला आणि सभागृहाबाहेर काढले
राष्ट्रवादीचे गणेश भोसले, संपत बारस्कर यांच्यासह भाजप आणि शिंदे गटाच्या नगरसेवकांनी छिंदमच्या बाकाकडे धाव घेतली. यावेळी काही सदस्यांनी त्याच्या हातातील माईक आणि अंदाजपत्रकाचे पुस्तक हिसकावून घेतले. "छिंदमला बाहेर काढा, अन्यथा आम्ही सभात्याग करू," असा इशारा दिल्यानंतर त्याला सभागृहाबाहेर जाण्यास भाग पाडले गेले. यावेळी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.
छिंदमची पोलीस अधीक्षकांकडे धाव
सभागृहातून हाकलून दिल्यानंतर श्रीपाद छिंदम याने थेट अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे यांची भेट घेतली. "नगरसेवकांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली असून यामागे स्थानिक आमदारांचा हात आहे," अशी तोंडी तक्रार त्याने केली. मात्र, पोलिसांनी त्याला यासंदर्भात लेखी तक्रार देण्याची सूचना केली आहे.
पद रद्द करण्याचा ठराव पुन्हा होणार?
या घटनेनंतर छिंदमचे नगरसेवक पद कायमस्वरूपी रद्द करण्याचा ठराव करावा, अशी मागणी सदस्यांनी लावून धरली. आयुक्त यशवंत डांगे यांनी पुढील सभेत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून असा ठराव मांडता येईल, असे सुचित केले. त्यानंतरच सभेचे कामकाज सुरळीत सुरू झाले.
काय आहे पार्श्वभूमी?
फेब्रुवारी 2018 मध्ये उपमहापौर असताना छिंदमने महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते, ज्याचा व्हिडिओ राज्यभर व्हायरल झाला होता. त्यावेळी त्याचे पद रद्द करण्यात आले होते, मात्र नुकत्याच झालेल्या निवडणुकीत तो पुन्हा अपक्ष म्हणून निवडून आला. जनतेने निवडून दिले असले, तरी सभागृहात त्याला स्थान द्यायचे नाही, असा ठाम निर्धार नगरसेवकांनी आज दाखवून दिला.




