मुख्य मजकुराकडे जा

दुबईतील सायबर गुन्ह्यांसाठी भारतातून १२ हजार सिमकार्डचा पुरवठा; आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश

पिंपरी-चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई; सिमकार्ड पुरवठा साखळीतील सात आरोपींना अटक

Vikrant Kulkarni
Vikrant Kulkarni

2 मिनिट वाचन

दुबईतील सायबर गुन्ह्यांसाठी भारतातून १२ हजार सिमकार्डचा पुरवठा; आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश
पिंपरी-चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई; सिमकार्ड पुरवठा साखळीतील सात आरोपींना अटक

पिंपरी, महाराष्ट्र मिरर : दुबईत बसून देशभरातील नागरिकांची ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्हेगारांना भारतातून तब्बल १० ते १२ हजार मोबाईल सिमकार्ड पुरविल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी-चिंचवड पोलिसांनी उघडकीस आणला आहे. या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करत पोलिसांनी आतापर्यंत सात आरोपींना अटक केली आहे.

पिंपरी-चिंचवड सायबर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान हे रॅकेट उघड झाले. मुख्य आरोपी सुमंत ऊर्फ नानू रविंद्र दसरे (वय २६, रा. निगडी प्राधिकरण) हा दुबईत राहून चीनमधील एका नागरिकाच्या मदतीने सायबर फसवणुकीचे गुन्हे करत असल्याचे निष्पन्न झाले. त्याला लूकआऊट सर्क्युलर (एलओसी) आणि इंटरपोलच्या माध्यमातून भारतात आणण्यात आले. त्यानंतर मुंबई विमानतळावरून पोलिसांनी त्याला अटक केली.

सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी यांनी आरोपींकडे केलेल्या तपासात मनिष अशोकलाल वाधवा (वय ४४, रा. अंबरनाथ) आणि महेश कन्हैयालाल चौइथरामानी (वय ६०, रा. कल्याण) हे दुबईतील आरोपीला सिमकार्ड पुरवत असल्याचे समोर आले. त्यांच्या चौकशीत सूरज मुन्नालाल चिकवा (वय ३२, रा. विक्रोळी) आणि राजा अशोक कुमार (वय ३१, रा. ठाणे) हे सिमकार्ड मिळवून देत असल्याचे उघड झाले. पोलिसांनी या चौघांनाही अटक केली.

ग्राहकांच्या नावावर सिमकार्ड, वापर सायबर गुन्ह्यांसाठी!

आरोपी मोबाईल कंपन्यांमध्ये सिमकार्ड विक्रीचे काम करत होते. ग्राहकांच्या नावावर सिमकार्ड काढल्यानंतर ओटीपी एक्सपायर झाला किंवा सर्व्हर नसल्याने सिमकार्ड सुरू झाले नाही, अशी खोटी कारणे सांगून ग्राहकांना सिमकार्ड दिले जात नव्हते. ही सिमकार्ड साथीदारांकडे देऊन त्याबदल्यात आर्थिक मोबदला घेतला जात होता.

या सिमकार्डचा वापर सायबर फसवणुकीसाठी कॉल करणे, बनावट अॅप्लिकेशनची नोंदणी, बँक खात्यांशी लिंक करून व्यवहार करणे तसेच बनावट ई-मेल आयडी तयार करण्यासाठी केला जात होता. आरोपींच्या पासपोर्ट तपासणीत ते २५ ते ३० वेळा दुबईला गेल्याचेही समोर आले आहे.

या प्रकरणात यापूर्वी तुषार अमराराम चौधरी (वय २९, रा. चिखली) आणि आदर्श संतोष वाघमारे (वय २७, रा. आकुर्डी) यांना अटक करण्यात आली होती. अशा प्रकारे एकूण सात आरोपींना अटक झाली आहे. या सिमकार्डचा इतर किती सायबर गुन्ह्यांमध्ये वापर झाला, याचा तपास सुरू आहे.

गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त रोहिदास पवार, सहाय्यक आयुक्त रोहिणी बानकर, सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रविकिरण नाळे, सहाय्यक निरीक्षक प्रवीण स्वामी, फौजदार सागर पोमण आदींसह पथकाने ही कारवाई केली.

शेअर करा
Vikrant Kulkarni

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper