गोकुळच्या दूध दरवाढीचा ग्राहकांना झटका; लिटरमागे ४ रुपयांची वाढ होण्याची शक्यता
म्हशीसह गायीच्या दुधाचे दर वाढवण्याचा प्रस्ताव; दूध उत्पादक शेतकऱ्यांनाही मिळणार दिलासा, अंतिम निर्णयाकडे लक्ष
2 मिनिट वाचन

कोल्हापूर : महागाईने आधीच सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना आता दूध दरवाढीची शक्यता निर्माण झाली आहे. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळकडून दूध विक्री आणि खरेदी दरात वाढ करण्याच्या हालचाली सुरू आहेत. म्हशीच्या आणि गायीच्या दुधाच्या विक्री दरात प्रतिलिटर ४ रुपये, तर दूध खरेदी दरात २ रुपये वाढ करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. गोकुळच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या बैठकीनंतर या दरवाढीबाबत चर्चा सुरू झाली असून, अंतिम निर्णयाकडे ग्राहक आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
गोकुळचे नवनिर्वाचित अध्यक्ष राजेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत दूध दरवाढीच्या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. दूध विक्री दरात वाढ करण्यापूर्वी मुंबईतील दूध वितरक आणि संबंधित घटकांशी चर्चा केली जाणार असल्याचे समोर आले आहे. येत्या दोन दिवसांत अंतिम निर्णय होण्याची शक्यता असून, २१ नोव्हेंबरपासून नवीन दर लागू होण्याचे संकेत आहेत.
शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढला
राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीमुळे चारा आणि पाण्याची उपलब्धता कमी झाली आहे. त्यातच पशुखाद्य, पेंड, सरकी, वाहतूक, पॅकिंग आणि मनुष्यबळाचा खर्च वाढल्याने दूध उत्पादन महागले आहे. परिणामी दूध उत्पादक शेतकऱ्यांवर आर्थिक भार वाढत आहे. या पार्श्वभूमीवर दूध खरेदी दरात वाढ करण्याची मागणी होत आहे. प्रस्तावित निर्णयामुळे शेतकऱ्यांना प्रतिलिटर दोन रुपये अधिक मिळण्याची शक्यता आहे.
दरवाढीवरून संचालकांमध्ये मतभेद
दरम्यान, दूध विक्री दरवाढीच्या प्रस्तावाला गोकुळमधील समविचारी आघाडीच्या संचालकांनी भूमिका स्पष्ट करत विरोध दर्शवला आहे. आधी दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खरेदी दरात वाढ करून त्यांना दिलासा द्यावा आणि त्यानंतरच विक्री दरवाढीचा निर्णय घ्यावा, अशी त्यांची मागणी आहे. त्यामुळे गोकुळमधील सत्ताधारी महायुती आणि समविचारी आघाडी यांच्यात या मुद्द्यावर मतभेद निर्माण झाले आहेत.
ग्राहकांच्या खिशाला बसणार झळ
अमूल आणि मदर डेअरीसारख्या दूध उत्पादक कंपन्यांनी यापूर्वीच दूध दरात वाढ केली आहे. आता गोकुळनेही दरवाढीचा निर्णय घेतल्यास मुंबई, पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील ग्राहकांना महागाईचा आणखी एक फटका बसणार आहे. रोजच्या आहारातील महत्त्वाचा घटक असलेल्या दुधासाठी ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागतील. त्यामुळे गोकुळच्या अंतिम निर्णयाकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्र मिरर




