कोल्हापुरात मद्यधुंद तरुणाच्या कारची दोघांना धडक; दोन सख्ख्या भावांचा मृत्यू
गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाविरोधात गुन्हा; अपघातानंतर कारसह घटनास्थळावरून पलायन
2 मिनिट वाचन

कोल्हापूर : मद्यधुंद अवस्थेत भरधाव कार चालवून दोघांना चिरडल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरात घडली आहे. शिवाजी विद्यापीठ परिसरात रविवारी मध्यरात्री झालेल्या या भीषण अपघातात उमेश पाथरुड आणि गणेश पाथरुड या दोन सख्ख्या चुलत भावांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी गोकुळचे माजी संचालक रणजितसिंह पाटील यांचा मुलगा पद्मसिंह रणजितसिंह पाटील याच्याविरोधात राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी मध्यरात्री पद्मसिंह पाटील हा मद्यधुंद अवस्थेत कार चालवत होता. शिवाजी विद्यापीठ परिसरातून जात असताना त्याच्या कारने उमेश पाथरुड आणि गणेश पाथरुड यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, दोघांचाही जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे एकाच कुटुंबातील दोन तरुणांचा दुर्दैवी अंत झाला असून, पाथरुड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अपघात घडल्यानंतर कारचालक पद्मसिंह पाटील याने घटनास्थळावर न थांबता कारसह पलायन केल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच राजारामपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून दोघांचे मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले.
दरम्यान, या घटनेनंतर कोल्हापुरात संताप व्यक्त केला जात आहे. राजारामपुरी पोलिस ठाण्यात पद्मसिंह पाटील याच्याविरोधात मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणे, अपघात करून घटनास्थळावरून पळ काढणे (हिट अँड रन) यासह अन्य संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मद्यपान करून वाहन चालवल्यामुळे दोन तरुणांना आपला जीव गमवावा लागल्याने नागरिकांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

महाराष्ट्र मिरर




