मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
हयात असताना अजित पवारांवर ७० हजार कोटींचे आरोप, आता गुणगान : उद्धव ठाकरेंचे अमित शहा यांच्यावर टीकास्त्रअजित पवार विमान अपघात प्रकरणावरून रोहित पवारांचे फडणवीसांवर गंभीर आरोप; CBI चौकशीची मागणीपुणे-सातारा रस्त्यावर बंगला फोडून ११.९५ लाखांचा ऐवज चोरीलाबेकायदेशीर मतदारांना वाचवण्यासाठी काँग्रेसचा आटापिटा : शेलारअजितदादांची कार्यपद्धती भावी राजकीय पिढीसाठी मोठे विद्यापीठ : अमित शाह यांचे गौरवोद्गार; निधनाने महाराष्ट्राचे न भरून निघणारे नुकसानसण-उत्सवांतून सामाजिक विद्वेष दूर करण्याची प्रेरणा घ्यावी : बाळासाहेब जानराव यांचे आवाहन

आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर २० नोव्हेंबरला 'अक्वान' चक्रीवादळ धडकण्याची शक्यता; ताशी १३० किमी वेगाने वारे वाहणार!

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या 'अक्वान' चक्रीवादळाचा धोका वाढला

Vikrant Kulkarni
Vikrant Kulkarni

2 मिनिट वाचन

आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर २० नोव्हेंबरला 'अक्वान' चक्रीवादळ धडकण्याची शक्यता
ताशी १३० किमी वेगाने वारे वाहणार

अमरावती : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या 'अक्वान' चक्रीवादळाचा धोका वाढला असून, येत्या २० नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास हे वादळ आंध्र प्रदेश आणि यानमच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे. नेल्लोर ते तुनीदरम्यानच्या किनारपट्टीवरून हे वादळ पुढे सरकण्याचा अंदाज आहे. यावेळी वाऱ्याचा वेग ताशी १२० ते १३० किलोमीटर, तर वाऱ्याच्या झोतांचा वेग ताशी १४५ किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो.

वादळाची तीव्रता वाढण्याचा अंदाज

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या प्रणालीची तीव्रता वाढत आहे. १७ नोव्हेंबरच्या रात्रीपर्यंत त्याचे तीव्र चक्रीवादळात, तर १९ नोव्हेंबरच्या संध्याकाळपर्यंत अति तीव्र चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवरील जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

सात जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

कोनसीमा, काकीनाडा, पूर्व गोदावरी, पश्चिम गोदावरी, कृष्णा, एनटीआर आणि गुंटूर या जिल्ह्यांमध्ये चक्रीवादळाचा परिणाम जाणवण्याची शक्यता आहे. या भागांत मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचे वारे वाहण्याचा अंदाज आहे.

महाराष्ट्रासह अनेक राज्यांत पावसाची शक्यता

१७ ते २० नोव्हेंबरदरम्यान आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पुदुचेरी आणि ओडिशाच्या किनारपट्टी भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. याशिवाय १९ ते २१ नोव्हेंबरदरम्यान छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश आणि विदर्भातील काही भागांतही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला

संभाव्य धोका लक्षात घेता मच्छीमारांना २० नोव्हेंबरपर्यंत समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आंध्र प्रदेश प्रशासनाने किनारपट्टीवरील भागांत खबरदारीचे उपाय सुरू केले असून, आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी मदत आणि बचाव यंत्रणा सज्ज ठेवण्याची तयारी केली आहे.

शेअर करा
Vikrant Kulkarni

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper