मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
अजितदादांची कार्यपद्धती भावी राजकीय पिढीसाठी मोठे विद्यापीठ : अमित शाह यांचे गौरवोद्गार; निधनाने महाराष्ट्राचे न भरून निघणारे नुकसानसण-उत्सवांतून सामाजिक विद्वेष दूर करण्याची प्रेरणा घ्यावी : बाळासाहेब जानराव यांचे आवाहनलंडनहून आणलेली छत्रपती शिवाजी महाराजांची 'वाघनखे' पुणेकरांसाठी उपलब्ध करून द्यावीतकष्टकरी सफाई कामगार आणि रिक्षाचालकांची दिवाळी गोड!स्वातंत्र्योत्तर बलशाली भारताचे स्वप्न.. स्वातंत्र्यपूर्व काळापासून नेहरूच्या ठायी होते : प्रा विशाल पतंगेलग्नसराईपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; सोने १,४०,००० रुपयांवर, खरेदीची हीच योग्य वेळ?

अजितदादांची कार्यपद्धती भावी राजकीय पिढीसाठी मोठे विद्यापीठ : अमित शाह यांचे गौरवोद्गार; निधनाने महाराष्ट्राचे न भरून निघणारे नुकसान

संवेदनशीलता, शिस्त, नियोजन आणि निर्धारित वेळेत काम पूर्ण करण्याची दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कार्यपद्धती महाराष्ट्रातील आगामी राजकीय पिढीसाठी मोठे विद्यापीठ ठरेल, असे गौरवोद्गार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काढले.

Vikrant Kulkarni
Vikrant Kulkarni

3 मिनिट वाचन

अजितदादांची कार्यपद्धती भावी राजकीय पिढीसाठी मोठे विद्यापीठ : अमित शाह यांचे गौरवोद्गार
निधनाने महाराष्ट्राचे न भरून निघणारे नुकसान

पुणे, महाराष्ट्र मिरर : संवेदनशीलता, शिस्त, नियोजन आणि निर्धारित वेळेत काम पूर्ण करण्याची दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कार्यपद्धती महाराष्ट्रातील आगामी राजकीय पिढीसाठी मोठे विद्यापीठ ठरेल, असे गौरवोद्गार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काढले. अजित पवार हे सहकार क्षेत्राचे चालतेबोलते ज्ञानकोश होते. त्यांच्या कार्याचा आणि प्रशासकीय कौशल्याचा अभ्यास नव्या पिढीतील नेत्यांसाठी मार्गदर्शक ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.

पुणे जिल्हा परिषद परिसरात सोमवारी दिवंगत अजित पवार यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण अमित शाह यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

अमित शाह म्हणाले की, अजित पवार यांच्या काम करण्याच्या पद्धतीत संवेदनशीलता, शिस्त आणि नियोजनाला विशेष महत्त्व होते. कोणतेही काम ठरलेल्या वेळेत पूर्ण करण्याचा त्यांचा कटाक्ष होता. राजकारणात काम करणाऱ्या नव्या पिढीने त्यांच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करून त्यातून प्रेरणा घ्यावी.

सहकार क्षेत्राचा चालताबोलता ज्ञानकोश

अजित पवार यांचा सहकार क्षेत्रातील अभ्यास अतिशय दांडगा होता. साखर कारखाने, दूध संघ, पतसंस्था आणि सहकारी बँकांच्या प्रशासकीय प्रश्नांची त्यांना सखोल माहिती होती. सहकार क्षेत्रातील बारकावे समजून घेण्याची त्यांची क्षमता उल्लेखनीय होती. त्यामुळे ते सहकार क्षेत्राचे चालतेबोलते ज्ञानकोश होते, अशा शब्दांत शाह यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला.

महायुती सरकारला मिळाले स्थैर्य

अजित पवार महायुतीमध्ये सहभागी झाल्यानंतर राज्यातील सरकारला स्थैर्य आणि सातत्य मिळाले. त्यांच्या सहभागामुळे सरकारला अनेक कठीण निर्णय घेणे शक्य झाले, असे अमित शाह यांनी सांगितले.

कोरोना काळातील कामाची आठवण

कोरोना महामारीच्या कठीण काळातील अजित पवार यांच्या कामाची आठवणही शाह यांनी यावेळी सांगितली. तत्कालीन मुख्यमंत्री उपलब्ध नसतानाही अजित पवार मंत्रालयात उपस्थित राहून प्रशासनाशी समन्वय साधत होते. ऑक्सिजन पुरवठा आणि अन्य मदतकार्य सुरळीत राहावे यासाठी त्यांनी विशेष लक्ष दिले होते. संकटाच्या काळात जबाबदारी स्वीकारून काम करण्याची त्यांची वृत्ती उल्लेखनीय होती, असे शाह म्हणाले.

कार्यकर्त्यांच्या हितासाठी नेहमी आग्रही

राजकीय चर्चा, जागावाटप किंवा पक्षांतर्गत निर्णय घेताना अजित पवार आपल्या पक्षातील तळागाळातील कार्यकर्त्यांच्या हिताला प्राधान्य देत असत. कार्यकर्त्यांच्या प्रश्नांवर ते ठाम भूमिका मांडत असत. नेतृत्व करताना कार्यकर्त्यांना विसरता कामा नये, हा त्यांच्याकडून शिकण्यासारखा महत्त्वाचा गुण असल्याचे शाह यांनी नमूद केले.

अजितदादांच्या निधनाने महाराष्ट्राचे मोठे नुकसान

अजित पवार यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः पुणे, बारामती आणि पिंपरी-चिंचवड परिसरासाठी त्यांनी दिलेले योगदान महत्त्वपूर्ण होते. त्यांच्या निधनामुळे निर्माण झालेली पोकळी पुढील तीन-चार दशके सामूहिक प्रयत्न करूनही भरून काढणे कठीण आहे, अशा भावना अमित शाह यांनी व्यक्त केल्या.

विमान अपघातात झाले होते निधन

२८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाले होते. त्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी पुणे जिल्हा परिषद परिसरात त्यांचा अर्धपुतळा उभारण्यात आला आहे. सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते या अर्धपुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि अन्य मान्यवरांनी अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला.

शेअर करा
Vikrant Kulkarni

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper