क्राईम न्यूजपुणेमहाराष्ट्र

बारामतीत दुचाकीस्वारांनी ज्येष्ठ महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

फिर्यादी बँकेतील काम संपवून पायी घरी जात होत्या

पुणे: बारामती शहरातील विजयनगर परिसरात एका ७६ वर्षीय ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडली आहे. भररस्त्यात दिवसाढवळ्या घडलेल्या या जबरी चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली असून, चोरटे पेन्सिल चौक परिसरातून वेगाने पसार झाले.

संबंधित महिलेने यासंदर्भात बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून दोन अनोळखी दुचाकीस्वारांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०४ आणि ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भररस्त्यात गाठले आणि हिसकावले दागिने
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (ता. २७) सकाळी पावणेबाराच्या सुमारास फिर्यादी या त्यांचे बँकेतील काम संपवून पायी घरी जात होत्या. त्या विजयनगरमधील सिल्व्हर अपार्टमेंट समोरील रस्त्यावर आल्या असता, समोरून एका दुचाकीवर दोन तरुण आले. दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या तरुणाने काही कळण्याच्या आत नायर यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जोराने हिसकावले.

पेन्सिल चौकाच्या दिशेने पोबारा
मंगळसूत्र हिसकावल्यानंतर दोन्ही चोरट्यांनी दुचाकीवरून पेन्सिल चौकाच्या दिशेने वेगात पळ काढला. नायर यांनी आरडाओरडा केला, मात्र तोपर्यंत चोरटे दृष्टीआड झाले होते. चोरीला गेलेले मंगळसूत्र दीड तोळे वजनाचे असून त्याची किंमत ४८ हजार २०० रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
बारामती पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरणाची तपासणी सुरू केली असून चोरट्यांचा माग काढला जात आहे. पोलीस हवालदार शिंदे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button