
Mumbai Local Train Latest News : समुद्रकिनारी जल्लोष करणाऱ्या प्रवाशांची सोय; मध्य आणि हार्बर मार्गावर अतिरिक्त फेऱ्यांचे नियोजन
मुंबई | नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईतील मरीन ड्राईव्ह, गेट वे ऑफ इंडिया आणि विविध चौपाट्यांवर होणारी गर्दी लक्षात घेता, मध्य रेल्वेने मुंबईकरांना मोठा दिलासा दिला आहे. 31 डिसेंबरच्या रात्री प्रवाशांना घरी परतणे सोपे व्हावे यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने चार विशेष लोकल चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे मध्यरात्री जल्लोष करून परतीच्या प्रवासाला निघणाऱ्या पर्यटकांची मोठी सोय होणार आहे. Mumbai Local Train News
रात्री उशिरापर्यंत पर्यटकांची गर्दी
मुंबईत दरवर्षी 31 डिसेंबरला गिरगाव चौपाटी, दादर, जुहू आणि बँडस्टँड यांसारख्या ठिकाणी लाखो नागरिक एकत्र येतात. मध्यरात्री 12 च्या सुमारास हा उत्साह शिगेला पोहोचलेला असतो. मात्र, उत्सव संपल्यानंतर घरी जाण्यासाठी लोकल उपलब्ध नसल्याने अनेकदा नागरिकांची तारांबळ उडते. हीच गैरसोय टाळण्यासाठी आणि प्रवाशांचा प्रवास सुखकर करण्यासाठी रेल्वेने हे पाऊल उचलले आहे.
विशेष लोकलचे वेळापत्रक खालीलप्रमाणे
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (31 डिसेंबर) मध्यरात्री या विशेष फेऱ्या चालवण्यात येतील:
1.मुख्य मार्ग (Main Line):
सीएसएमटी ते कल्याण: सीएसएमटी येथून मध्यरात्री 1.30 वाजता विशेष लोकल सुटेल आणि पहाटे 3.00 वाजता कल्याणला पोहोचेल.
कल्याण ते सीएसएमटी: कल्याण येथून मध्यरात्री 1.30 वाजता विशेष लोकल सुटेल आणि पहाटे 3.00 वाजता सीएसएमटीला पोहोचेल.
2 हार्बर मार्ग (Harbour Line):
सीएसएमटी ते पनवेल: सीएसएमटी येथून रात्री 1.30 वाजता विशेष लोकल सुटेल आणि रात्री 2.50 वाजता पनवेलला पोहोचेल.
पनवेल ते सीएसएमटी: पनवेल येथून रात्री 1.30 वाजता विशेष लोकल सुटेल आणि रात्री 2.50 वाजता सीएसएमटीला पोहोचेल.
सर्व स्थानकांवर थांबा
प्रवाशांच्या सुविधेसाठी या चारही विशेष लोकल त्यांच्या मार्गावरील सर्व स्थानकांवर थांबतील. यामुळे केवळ शेवटच्या स्थानकावरील प्रवाशांनाच नव्हे, तर मधल्या स्थानकांवर राहणाऱ्या नागरिकांनाही आपल्या घरी सुखरूप पोहोचता येईल. तसेच, नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी पहाटे मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठीही या गाड्या उपयुक्त ठरणार आहेत.



