पुरंदर विमानतळ प्रकल्पाबाबत अफवा पसरवणारे बनावट पत्र व्हायरल

फिर्यादी यांच्या कार्यालयाचे बनावट लेटरपॅड तयार केले; सासवड पोलिसांत गुन्हा दाखल
पुणे: पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित ‘छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ’ प्रकल्पाबाबत सोशल मीडियावर खोटी माहिती पसरवून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विमानतळासाठी प्रस्तावित असलेली जागा तांत्रिक तपासणीत अयोग्य ठरल्याचे बनावट पत्र तयार करून ते व्हॉट्सॲप ग्रुपवर प्रसारित केल्याप्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत संतोष हरी बरगे (वय ३७, रा. राजगुरूनगर, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात इसमाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३३६(२) आणि ३३६(४) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही घटना १२ मे २०२६ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास उदाचीवाडी, खानवडी, कुंभारवळण, पारगाव, एखतपुर आणि मुंजवडी या गावांतील शेतकरी व्हॉट्सॲप ग्रुपवर घडली.
बनावट लेटरपॅडचा वापर
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांच्या कार्यालयाचे बनावट लेटरपॅड तयार केले. त्यावर “छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ पुरंदर प्रकल्पासाठी प्रस्तावित असलेली जागा तांत्रिक तपासणीनंतर अयोग्य ठरली आहे,” असा खोटा मजकूर लिहून बनावट पत्र तयार केले. हे पत्र विमानतळ बाधित गावांतील शेतकऱ्यांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर मोठ्या प्रमाणावर प्रसारित करण्यात आले.
भूसंपादनाबाबत निर्माण केला संभ्रम
विमानतळ प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रक्रिया प्रस्तावित असताना, अशा प्रकारचे बनावट पत्र समोर आल्याने उदाचीवाडी, खानवडी, कुंभारवळण, पारगाव, एखतपुर आणि मुंजवडी येथील ग्रामस्थांमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संभ्रम निर्माण झाला. शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याच्या आणि लोकांची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने हे कृत्य केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
सायबर पोलिसांची मदत घेणार
सोशल मीडियावर अफवा पसरवणे आणि बनावट शासकीय कागदपत्रे तयार करणे हा गंभीर गुन्हा आहे. हे बनावट पत्र नेमके कोणी तयार केले आणि सर्वात आधी ते कोणत्या मोबाईल क्रमांकावरून प्रसारित झाले, याचा शोध घेण्यासाठी सासवड पोलीस सायबर सेलची मदत घेणार आहेत. नागरिकांनी अशा कोणत्याही अनधिकृत पत्रांवर किंवा माहितीवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
पोलीस हवालदार शेगर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
पुणे न्युज



