Thane Crime News : ठाण्यात देशी बनावटीची पिस्तूल बाळगणाऱ्या ड्रायव्हरला अटक

•गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखेची कारवाई; आरोपीकडून 2 पिस्तूल आणि 2 काडतुसे जप्त
ठाणे :- ठाण्यातील राबोडी परिसरात बेकायदेशीरपणे अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या एका व्यक्तीला गुन्हे शाखा घटक-1 च्या पथकाने अटक केली आहे. आरोपीकडून दोन देशी बनावटीची पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. जाबीर इलियास सिद्दीकी (वय 36) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तो कौसा-मुंब्रा येथे राहणारा आणि व्यवसायाने ड्रायव्हर आहे.
गुन्हे शाखेला 30 जुलै 2025 रोजी यासंदर्भात गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे, पोलिसांनी साकेत कॉम्प्लेक्स रोड, राबोडी येथे सापळा रचला. पोलिसांनी आरोपी जाबीर सिद्दीकी याला ताब्यात घेऊन त्याची तपासणी केली असता, त्याच्याकडे दोन पिस्तूल आणि दोन काडतुसे आढळून आली.
याप्रकरणी आरोपीविरुद्ध राबोडी पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम 1959 आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने आरोपीला 3 ऑगस्ट 2025 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून, या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रवींद्र पाटील करत आहेत.
ही कारवाई ठाण्याचे अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. पंजाबराव उगले, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) अमरसिंह जाधव, आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये गुन्हे शाखा घटक-1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील पथकात पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शिरसाठ, रवींद्र पाटील, तसेच धनंजय आहेर, नंदकुमार पाटील, मयूर लोखंडे आणि सागर सुरळकर यांचा समावेश होता.




