
Suresh Dhas On Beed Accident : “दुर्दैवी अपघात, मुलानेच पोलिसांना माहिती दिली” – आमदार सुरेश धस यांचे स्पष्टीकरण
मुंबई | अहमदनगर जिल्ह्यातील अहिल्यानगर-पुणे मार्गावर घडलेल्या अपघातात दुचाकीस्वार नितीन शेळके (वय अंदाजे 30) यांचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे या धडक देणाऱ्या कारचा संबंध भाजपाचे आमदार सुरेश धस यांचा मुलगा सागर धस याच्याशी असल्याचे उघडकीस आले असून, याप्रकरणी सुपा पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई केली आहे.
ही घटना जातेगाव फाट्याजवळ मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. कार व दुचाकी यांच्यात झालेल्या धडकेत नितीन शेळके हे गंभीर जखमी झाले आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनेनंतर कारवाई सुरू, ब्लड सॅम्पलही घेतले
या अपघातानंतर सुपा पोलीस स्टेशनमध्ये आमदार धस यांचा मुलगा सागर धस आणि आणखी एकाच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याचबरोबर दोघांचे रक्तनमुने (ब्लड सॅम्पल्स) घेण्यात आले असून, अपघाताची चौकशी सुरू आहे.
दरम्यान, या प्रकरणावरून विरोधकांनी जोरदार टीका सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार सुरेश धस यांनी , वृत्तवाहिनीशी बोलताना स्पष्टीकरण दिले.
“दुर्दैवी घटना, मुलानेच पोलिसांना माहिती दिली” — सुरेश धस
“माझा मुलगा उपचारासाठी मुंबईकडे निघाला होता. रात्री 9 वाजता तो घरून निघाला आणि साडेदहाच्या सुमारास जातेगाव फाट्यावर अपघात झाला. त्यानंतर त्याने आणि मृत नितीन शेळके यांच्या भावाने मिळून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. दुर्दैवाने मृत्यू झाला,”
असं धस म्हणाले.
तसेच त्यांनी पुढे सांगितले की,“घटनेनंतर पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली आहे.आरोप-प्रत्यारोपाचा हा विषय नाही. मुलाने स्वतः सुपा पोलिसांना फोन करून माहिती दिली होती. जर कुणाला चौकशी करायची असेल, तर ती निष्पक्ष व्हावी.”



