Amol Mitkari : ‘अजित पवार, तुम्ही सगळ्यांचा नाद करा, पण अनगरकरांचा नाही!’ बाळराजे पाटलांच्या आव्हानाला अमोल मिटकरींचे जहाल प्रत्युत्तर

Amol Mitkari On Balraje Patil : ‘ज्यांच्या तुकड्यावर जगलात, त्यांच्याबद्दल केलेली मस्तीची भाषा’; मिटकरींकडून ‘मोकाट कार्टी’ असा जहाल उल्लेख
सोलापूर (अनगर) :- सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगपंचायतीच्या निवडणुकीवरून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि भाजप नेते राजन पाटील Rajan Patil यांच्यात सध्या जोरदार राजकीय युद्ध सुरू आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतून राष्ट्रवादीच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद ठरल्यानंतर राजन पाटील यांचे पुत्र विक्रांत ऊर्फ बाळराजे पाटील यांनी अजित पवारांना थेट आव्हान दिले. या आव्हानाला राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक अमोल मिटकरी यांनी जहाल भाषेत प्रत्युत्तर दिले आहे.
बाळराजे पाटलांचे थेट आव्हान
गेल्या अनेक वर्षांपासून अनगरमध्ये राजन पाटील यांची अनभिषिक्त सत्ता आहे. अर्ज छाननीत उज्ज्वला थिटे यांचा उमेदवारी अर्ज तांत्रिक कारणास्तव (सूचकाची सही नसणे) बाद ठरवण्यात आल्यानंतर राजन पाटील समर्थकांनी जोरदार जल्लोष केला. या जल्लोषात आघाडीवर असलेले बाळराजे पाटील यांनी प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर बोट दाखवत अजित पवारांना थेट आव्हान दिले.
“अजित पवार तुम्ही सगळ्यांचा नाद करा, पण अनगरकरांचा नाही,” असे वाक्य उच्चारलेला त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.
अमोल मिटकरींचे जहाल प्रत्युत्तर
बाळराजे पाटील यांच्या या ‘मस्तीच्या’ भाषेला अमोल मिटकरी यांनी ट्विटद्वारे जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यांनी राजन पाटील आणि त्यांच्या मुलांवर अत्यंत जहाल शब्दांत टीका केली आहे.
“राजन पाटील आणि त्यांची दोन्ही वाया गेलेली मोकाट कार्टी यांना सत्तेचा अतिमाज आला आहे. ज्यांच्या तुकड्यावर जगलात त्यांच्याबद्दल केलेली मस्तीची भाषा याला प्रसंगी योग्य उत्तर देऊच. पण तूर्तास या औलादींच्या मस्तीच्या वागण्याने ‘मालकाला’ भिकारी बनवेल.. तुर्तास इतकेच.”
अनगर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यामुळे राजन पाटील यांच्या सूनेचा बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. स्थानिक निवडणुकीच्या या विजयानंतर राजकीय वातावरण मात्र चांगलेच तापले आहे.



