कोल्हापूर

Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युला

• 16 विरुद्ध 13 मतांनी महायुतीचा विजय; आगामी सत्तावाटपासाठी ठरले नवीन समीकरण

कोल्हापूर :- राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) अध्यक्षपदाच्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार तथा माजी आमदार राजेश पाटील यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी मोसमी चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेमध्ये सत्तासंघर्षाचा अंतिम फैसला झाला. मात्र, या निवडीमध्ये एक मोठा ट्विस्ट समोर आला असून, राजेश पाटील हे केवळ वर्षभरासाठीच अध्यक्षपद भूषवणार असल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी स्पष्ट केले आहे. महायुतीमधील ठरलेल्या आतील फॉर्म्युल्यानुसार पहिल्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसकडे अध्यक्षपद आल्याने हा निर्णय घेण्यात आला असून, आगामी काळात इतर घटकांचा विचार केला जाईल.

“राजेश पाटील वर्षभरासाठी अध्यक्ष राहतील, त्यानंतर पुढील निर्णय घेऊ” — खासदार धनंजय महाडिकांचा गौप्यस्फोट

गोकुळच्या अध्यक्षपदासाठी सतेज पाटील यांच्या राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीकडून शशिकांत पाटील-चुयेकर आणि महायुतीप्रणित छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीकडून राजेश पाटील यांच्यात थेट सामना रंगला होता. या निवडणुकीत प्रत्यक्ष 25 निवडून आलेले संचालक आणि 4 शासननियुक्त संचालक अशा एकूण 29 जणांनी सहभाग घेतला. अखेरच्या मतमोजणीत महायुतीला 16 मते मिळाली, तर विरोधी गटाला 13 मते मिळाल्याने महायुतीने दणदणीत विजय मिळवला. शासनाने नियुक्त केलेल्या चारही सदस्यांनी महायुतीच्या बाजूने मतदान केल्यामुळे सत्ता स्थापनेचा मार्ग सुकर झाला.

निकाल उलट झाल्यास पुन्हा प्रशासक येतील — मुश्रीफांचा संचालकांना थेट सवाल

या विजयानंतर बोलताना मंत्री हसन मुश्रीफ यांनी विरोधकांवर आणि काही संचालकांवर कडक शब्दांत ताशेरे ओढले. गोकुळचा हा कारभार आणि न्यायालयीन लढाई यावर भाष्य करताना त्यांनी स्पष्ट केले की, जर भविष्यात निकाल उलट गेला तर संस्थेत पुन्हा प्रशासक राज येऊ शकते, त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. दरम्यान, राजेश पाटील यांची वर्षभरासाठी झालेली ही निवड आणि महायुतीचा ठरलेला आगामी फॉर्म्युला यामुळे कोल्हापूरच्या सहकार आणि राजकारणात आगामी काळात आणखी काय नवीन समीकरणे पाहायला मिळणार, याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button