पुण्यात विशेष मोहिमेत १७१ तळीराम चालक जाळ्यात

३ दिवसांत ३३ ठिकाणी नाकाबंदी लावून कारवाई
पुणे: पुणे शहरात रस्ते सुरक्षा वाढवण्यासाठी आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी शहर वाहतूक विभागाने मद्यपी चालकांविरुद्ध तीन दिवसांची विशेष मोहीम राबवली. या मोहिमेत शहरातील ३३ महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी करून तब्बल १७१ वाहनचालकांवर मद्यपान करून वाहन चालविल्याबद्दल कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवार (ता. २४ मार्च) ते गुरुवार (ता. २६ मार्च) या तीन दिवसांच्या कालावधीत ही धडक मोहीम राबवण्यात आली. पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील विविध भागांमध्ये ३३ नाकाबंदी पॉईंट्स निश्चित करण्यात आले होते. या ठिकाणी वाहतूक पोलिसांनी ‘ब्रेथ ॲनालायझर’ (Breath Analyzer) यंत्राद्वारे संशयित चालकांची तपासणी केली.
अपघात रोखण्यासाठी कडक पावले
मद्यपान करून वाहन चालवणे हे रस्ते अपघातांचे प्रमुख कारण ठरत आहे. त्यामुळे नागरिकांचे प्राण व मालमत्तेचे संरक्षण व्हावे, तसेच शहरात शिस्तबद्ध वाहन संस्कृती निर्माण व्हावी, या उद्देशाने ही कारवाई करण्यात आली. १७१ मद्यपी चालकांव्यतिरिक्त वाहतुकीचे इतर नियम मोडणाऱ्या चालकांवरही मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
171 Taliram drivers caught in a special operation in Pune



