नागपूर
Trending

Datta Meghe : विदर्भाचा ‘महामेरू’ हरपला! ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांचे 89 व्या वर्षी निधन; तीन वेगवेगळ्या मतदारसंघांतून खासदार होण्याचा विक्रम

Datta Meghe Latest News : राजकारण, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील ऋषीपुल्य व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड; गडकरींशी असलेल्या घनिष्ठ मैत्रीचा प्रवास संपला

नागपूर :- विदर्भातील ज्येष्ठ राजकारणी, शिक्षणतज्ज्ञ आणि निष्कलंक समाजसेवक दत्ता राघोबाजी मेघे यांचे रविवारी रात्री 89 व्या वर्षी निधन झाले. गेल्या 40 वर्षांहून अधिक काळ सार्वजनिक जीवनात सक्रिय असलेल्या मेघे यांच्या निधनामुळे संपूर्ण विदर्भावर शोककळा पसरली असून, राजकारण आणि शिक्षण क्षेत्रातील एका मोठ्या पर्वाचा अंत झाला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या निधनावर तीव्र दुःख व्यक्त करत आदरांजली वाहिली आहे.

राजकीय प्रवासातील अढळ स्थान

दत्ता मेघे यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात काँग्रेस पक्षातून केली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून पुढे आलेल्या मेघे यांनी आपल्या मृदू स्वभावामुळे आणि जनसंपर्कामुळे विदर्भाच्या राजकारणात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले.

मंत्रीपदाचा प्रवास: 1978 मध्ये शरद पवार यांच्या ‘पुलोद’ सरकारमध्ये ते पहिल्यांदा मंत्री झाले. त्यानंतर त्यांनी अनेक वर्षे राज्य मंत्रिमंडळात विविध महत्त्वाची पदे भूषवली.

निवडणुकीचा विक्रम: विदर्भातील नागपूर (1991), रामटेक (1196) आणि वर्धा (1998) अशा तीन वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघांतून खासदार म्हणून निवडून येणारे ते विदर्भातील एकमेव नेते ठरले.

भाजप प्रवेश: 2014 मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि तेव्हापासून ते पक्षाच्या प्रत्येक निवडणूक रणनीतीचा अविभाज्य भाग होते.

शिक्षण आणि आरोग्याचे ‘सावंगी’ साम्राज्य

केवळ राजकारणच नव्हे, तर विदर्भाच्या शैक्षणिक आणि आरोग्य नकाशावर दत्ता मेघे यांनी आपले नाव सुवर्ण अक्षरात कोरले आहे. वर्धा येथील सावंगी मेघे येथे त्यांनी उभे केलेले वैद्यकीय महाविद्यालय आणि अद्ययावत रुग्णालय हे संपूर्ण मध्य भारतासाठी आधारवड ठरले आहे. गरीबांना स्वस्त आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी, यासाठी त्यांनी आयुष्यभर कष्ट घेतले.

नितीन गडकरींशी ‘नात्यापलीकडची’ मैत्री

दत्ता मेघे आणि नितीन गडकरी यांची मैत्री राजकारणाच्या पलीकडची होती. त्यांच्यातील विश्वासाची प्रचिती देणारे एक गुपित स्वतः मेघे यांनी जाहीरपणे उघड केले होते. आपल्या मृत्युपत्रात कोणताही घोळ होऊ नये आणि कुटुंबात अडचण येऊ नये, यासाठी मेघे यांनी आपल्या मृत्युपत्रात नितीन गडकरी यांचे नाव लिहिले होते. ही बाब त्यांच्यातील निखळ मैत्रीचे आणि पारदर्शक संबंधांचे प्रतीक मानली जाते.

विदर्भातील कार्यकर्त्यांचे ‘दत्ताभाऊ’

दत्ता मेघे यांनी आपल्या 40 वर्षांच्या कारकिर्दीत हजारो कार्यकर्ते घडवले. रात्री उशिरा त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच नागपूर आणि वर्धा परिसरात त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. त्यांच्या निधनाने विदर्भाने एक मार्गदर्शक आणि आधारस्तंभ गमावला आहे, अशा भावना सर्वपक्षीय नेत्यांनी व्यक्त केल्या आहेत.

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button