पुणे-सोलापूरसह चार जिल्ह्यांत दहशत माजवणारी ‘भोसले टोळी’वर मोक्काच्या

कुख्यात अटल्यासह ५ जण जेरबंद; दरोडा, खुनाचा प्रयत्न आणि जबरी चोरी अशा १८ गंभीर गुन्ह्यांमध्ये सामील
या टोळीने १९ जून २०२५ रोजी दौड तालुक्यातील बोरीबेल येथील भापकरवस्ती येथे एका कुटुंबाला शस्त्राचा धाक दाखवून ३ लाख ५२ हजार ५०० रुपयांचे दागिने आणि रोकड लंपास केली होती
पुणे: दौंड, अहिल्यानगर, सोलापूर आणि बीड जिल्ह्यांमध्ये दरोडा, खुनाचा प्रयत्न आणि जबरी चोरी अशा १८ गंभीर गुन्ह्यांद्वारे दहशत प्रस्थापित करणाऱ्या कुख्यात योगेश ऊर्फ अटल्या ईश्वर भोसले याच्या टोळीवर अखेर ‘मोक्का’ (MCOCA) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी या टोळीविरुद्ध संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार कारवाई करण्यास मंजुरी दिली आहे. यामुळे आंतरजिल्हा गुन्हेगारी करणाऱ्या टोळ्यांचे धाबे दणाणले आहेत.

याप्रकरणी पोलिसांनी योगेश ऊर्फ अटल्या ईश्वर भोसले (वय २४), सचिन ईश्वर भोसले (वय २५), गहिनीनाथ ईश्वर भोसले (वय २७), मिलन ऊर्फ मिलिंद ईश्वर भोसले (वय २५) आणि सोन्या ईश्वर भोसले (वय ३५, सर्व रा. बेलगाव, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) यांना अटक केली आहे. या टोळीतील युवराज ऊर्फ धोंड्या ईश्वर भोसले हा अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या टोळीने १९ जून २०२५ रोजी दौंड तालुक्यातील बोरीबेल येथील भापकरवस्ती येथे एका कुटुंबाला शस्त्राचा धाक दाखवून ३ लाख ५२ हजार ५०० रुपयांचे दागिने आणि रोकड लंपास केली होती. ज्ञानेश्वर चंद्रकांत सावंत यांनी याप्रकरणी दौड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
स्थानिक गुन्हे शाखा आणि दौंड पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय बातमीदारांच्या मदतीने या टोळीचा छडा लावला. सहायक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ यांना मिळालेल्या माहितीनुसार, ही टोळी दोन मोटारसायकलवरून पुणे-अहिल्यानगर सीमेवरील शिरापूर येथे येणार असल्याचे समजले. पोलिसांनी तेथे सापळा लावून अटल्या भोसले आणि त्याच्या दोन भावांना शिताफीने ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी आपल्या इतर भावांच्या मदतीने पुणे, सोलापूर, सातारा आणि बीड जिल्ह्यांत दिवसा घरफोड्या आणि दरोडे टाकल्याची कबुली दिली. या टोळीवर खुनाचा प्रयत्न, अवैध अग्निशस्त्रांचा वापर आणि सरकारी नोकरांवर हल्ला करण्यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतलेल्या बैठकीत संघटित टोळ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी या टोळीविरुद्ध मोक्का कारवाईचा प्रस्ताव सादर केला होता. विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी या प्रस्तावाची पडताळणी करून मंजुरी दिली. या गुन्ह्याचा पुढील तपास दौंड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस करत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, दौंडचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार, सहायक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ, पोलीस उपनिरीक्षक रूपेश कदम आणि त्यांच्या पथकाने केली. या कारवाईमुळे दौंड आणि परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, गुन्हेगारी टोळ्यांच्या दहशतीला लगाम बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Mokka's attack on 'Bhosale gang' that terrorizes four districts including Pune-Solapur



