Rohit Pawar : अजित पवार अपघात की घातपात? रोहित पवारांचा ‘रेकी’चा खळबळजनक दावा; ‘ॲरो’ ग्रुपमधील बड्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
•”अजितदादांच्याच रिपोर्टमध्ये तपास अधिकाऱ्यांची नावं का गायब?” | व्हिजिबिलिटी नसताना लँडिंगला परवानगी कुणी दिली? | रोहित पवारांचा ‘एआयबी’च्या कार्यपद्धतीवर थेट हल्ला
मुंबई :- महाराष्ट्राचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीत आता रोज नवनवे खुलासे होत आहेत. आमदार रोहित पवार यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाभोवती असलेल्या संशयाबाबत मोठा ‘बॉम्ब’ टाकला आहे. अपघातापूर्वी बारामती विमानतळाची रेकी झाल्याचा संशय व्यक्त करत, त्यांनी या प्रकरणातील दोषींवर गुन्हे दाखल करण्याची आग्रही मागणी केली आहे.
विमानतळाची रेकी झाली होती?
रोहित पवार यांनी उपस्थित केलेला सर्वात गंभीर मुद्दा म्हणजे विमानतळाची रेकी. ते म्हणाले,”काही लोकांच्या मते, या अपघातापूर्वी बारामती विमानतळाची रेकी झाली होती. आम्हाला याची पक्की खात्री नाही, पण या अँगलने तपास होणे गरजेचे आहे. जर रेकी झाली असेल, तर हा सरळ सरळ घातपाताचा प्रकार आहे.”
तपास अहवालात नावांची हेराफेरी?
रोहित पवारांनी ‘एआयबी’च्या (AIB) रिपोर्टमधील तांत्रिक त्रुटींकडे लक्ष वेधले आहे. 23 तारखेच्या एका जुन्या अहवालात तपास अधिकाऱ्यांची नावे होती, मात्र अजितदादांच्या अपघाताच्या अहवालातून तपास करणाऱ्यांची नावे का गायब करण्यात आली? कागदपत्रात हेराफेरी करण्यासाठीच नावे दिली नसतील का, असा सवाल त्यांनी विचारला आहे. “अजितदादांच्याच बाबतीत असा भेदभाव का केला जातोय?” असा तिखट प्रश्न त्यांनी विचारला.
‘ॲरो’ (AERO) ग्रुपवर निशाणा
रोहित पवारांनी या प्रकरणातील सर्वात मोठी मागणी केली ती म्हणजे ‘ॲरो’ नावाच्या ग्रुपमधील सर्वांवर गुन्हा दाखल करण्याची.
जबाबदारी कुणाची? या ग्रुपमध्ये सिव्हिल एव्हिएशनचे सरकारी अधिकारी आणि बड्या पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.
नियम धाब्यावर: व्हिजिबिलिटी (दृश्यमानता) कमी असताना विमान लँड करू नका, असा ‘त्यागी समिती’चा स्पष्ट अहवाल असतानाही विमानाला बारामतीकडे वळवण्याची परवानगी कशी मिळाली?
पायलटला माहिती होती: दोन्ही वैमानिकांना बारामतीच्या धावपट्टीची (Runway 29 & 11) पूर्ण माहिती होती, ते तिथे अनेकदा लँड झाले होते. मग नेमकी चूक कुठे झाली?
क्रिमिनल जबाबदारी निश्चित करा
“एआयबी म्हणते आम्ही कुणाची जबाबदारी निश्चित करत नाही, पण मग कुणाच्या निष्काळजीपणामुळे अजितदादांसारखा मोठा नेता राज्याने गमावला, याचे उत्तर कोण देणार?” असा संतप्त सवाल रोहित पवारांनी केला आहे. या प्रकरणातील दोषींवर तात्काळ एफआयआर (FIR) दाखल करून त्यांना जेरबंद करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.



