मुंबई

Bitcoin Fraud : 20 हजार कोटींचा बिटकॉईन घोटाळा: सीबीआयचा मोठा अ‍ॅक्शन प्लॅन; फरारी मुख्य तांत्रिक अधिकारी आयुष वार्षनेय मुंबई विमानतळावरून गजाआड

•डार्विन लॅब्सचा सह-संस्थापक अटकेत; ‘गेन-बिटकॉईन’ बोगस योजनेला तांत्रिक रसद पुरवल्याचा आरोप

मुंबई :- देशाला हादरवून सोडणाऱ्या 20 हजार कोटी रुपयांच्या बिटकॉईन घोटाळ्यातील एक अत्यंत महत्त्वाचा दुवा आणि डार्विन लॅब्सचा फरारी सह-संस्थापक आयुष वार्षनेय याला अखेर मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सीबीआयच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. गेली काही वर्षे फरार असलेला आयुष मंगळवारी भारताबाहेर पळून जाण्याच्या तयारीत असतानाच, इमिग्रेशन अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे त्याला रंगेहात पकडण्यात आले. या अटकेमुळे आता अनेक वर्षांपासून थंड बस्त्यात असलेल्या या महाघोटाळ्याच्या तपासाला पुन्हा एकदा वेग आला आहे.

अमित भारद्वाज आणि अजय भारद्वाज या बंधूंनी 2015 मध्ये ‘व्हरिएबलटेक प्रा. लि.’ च्या नावाखाली ‘गेन-बिटकॉईन’ नावाची एक बोगस योजना लाँच केली होती. गुंतवणूकदारांना 18 महिन्यांत तब्बल 10 टक्के परताव्याचे आमिष दाखवून देशभरातील आठ ते दहा हजार सामान्य नागरिकांची 20 हजार कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली. 2017 मध्ये हे कारस्थान उघडकीस येताच या घोटाळ्याचे पडसाद देशभर उमटले. सर्वोच्च न्यायालयाने 2023 मध्ये तपासाची धुरा सीबीआयकडे सोपवल्यानंतर सीबीआयने या प्रकरणातील जाळे विणायला सुरुवात केली होती.

या घोटाळ्यासाठी लागणारे तांत्रिक व्यासपीठ उभे करण्याची संपूर्ण जबाबदारी आयुष वार्षनेयच्या डार्विन लॅब्सवर होती. केवळ ‘जीबीमायनर’ सारख्या संकेतस्थळांची निर्मितीच नव्हे, तर ‘एमकॉप’ नावाच्या बनावट क्रिप्टो चलनाचा संपूर्ण आराखडा तयार करण्याचे काम याच कंपनीने केले होते. घोटाळ्यातील इतर दोन मुख्य सूत्रधार साहिल बाघला आणि निकुंज जैन यांना यापूर्वीच सीबीआयने बेड्या ठोकल्या आहेत, तर मुख्य आरोपींपैकी एक असलेल्या अमित भारद्वाजचे 2022 मध्ये निधन झाले आहे. आता आयुष वार्षनेयच्या अटकेमुळे फरार असलेला अजय भारद्वाज आणि परदेशात गुंतवण्यात आलेला कोट्यवधी रुपयांचा काळा पैसा, यावर मोठा प्रकाश पडण्याची शक्यता आहे. सीबीआय आणि सक्तवसुली संचालनालयाने (ED) या प्रकरणातील तपासाचा फास आवळला असून, या अटकेने आता अनेक बड्या धेंडांची झोप उडणार आहे.

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button