मुंबईठाणे
Trending

Sanjay Raut : “शिक्षण खातं तो भोंदू बाबा चालवायचा!”; संजय राऊतांचा दीपक केसरकरांवर खळबळजनक आरोप, 9 मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

Sanjay Raut On Dipak Kesarkar : ट्रायडंट हॉटेलमधून बदल्या आणि बढत्यांचे रॅकेट; फडणवीस सरकार उलथवण्यासाठी ‘विधी’ केल्याचा राऊतांचा दावा

मुंबई :- नाशिकचा स्वयंघोषित ‘कॅप्टन’ अशोक खरात Ashok Kharat याच्या सेक्स स्कँडल आणि भोंदूगिरीच्या प्रकरणाने महाराष्ट्राच्या राजकारणात ‘खरात फाईल्स’चा स्फोट झाला आहे. या वादात आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते खासदार संजय राऊत Sanjay Raut यांनी थेट उपमुख्यमंत्री यांच्या मंत्रिमंडळावर तोफ डागली आहे. “राज्याचे शिक्षण खातं हे मंत्री नव्हे, तर तो भोंदू बाबा चालवायचा,” असा खळबळजनक आरोप करत राऊतांनी खरात प्रकरणाचे धागेदोरे मंत्रालयातील बदल्या आणि बढत्यांपर्यंत पोहोचल्याचे सांगितले.

“केसरकरांच्या बदल्या आणि बढत्या बाबा ठरवायचा”

संजय राऊत यांनी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले,”नाशिकचा हा भोंदू बाबा अनेक काळापासून मंत्र्यांना सल्ले देत होता. मंत्रालयातील बदल्या आणि विशेषतः शिक्षण खात्यातील बढत्यांमध्ये या बाबाचा मोठा हस्तक्षेप होता. दीपक केसरकर मंत्री असताना ट्रायडंट हॉटेलमध्ये बसून खरातच्या सांगण्यावरून हे सर्व व्यवहार चालत असत. जर शिक्षण खातं एक भोंदू बाबा चालवत असेल, तर हे राज्याचे दुर्दैव आहे.”

सरकार उलथवण्यासाठी ‘अघोरी विधी’?

राऊतांनी देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “देवेंद्र फडणवीस हे स्वतःला सावरकरांचे भक्त आणि विज्ञानवादी मानतात. मात्र, याच भोंदू बाबाच्या दरबारात फडणवीसांचे सरकार उलथवण्यासाठी अघोरी विधी करण्यात आले, म्हणूनच या धाडी पडल्या,” असा दावा राऊतांनी केला आहे. या अंधश्रद्धेचा वापर करून सत्ता टिकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या मंत्र्यांना फडणवीसांनी तत्काळ बाहेरचा रस्ता दाखवावा, अशी मागणी त्यांनी केली.

“रुपाली चाकणकर हे केवळ हिमनगाचे टोक”

रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यावर भाष्य करताना राऊत म्हणाले की, “चाकणकर म्हणजे केवळ हिमनगाचे टोक आहेत. मंत्रिमंडळातील इतर 9 मंत्री या भोंदू बाबाचे नियमित भक्त होते. खरातसारखा एक बाबा गजाआड गेला असला, तरी मंत्रालयात वावरणारे इतर अनेक बाबा अद्याप मोकळे आहेत. शिंदे गटाच्या मंत्र्यांनी अशा ढोंगी गोष्टींचा पुरस्कार केला असून, त्यांनीच खऱ्या हिंदुत्वाला काळिमा फासला आहे.”

शिंदे गटाला आव्हान: “केसरकरांचा राजीनामा घ्या!”

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून राऊत म्हणाले, “जर एकनाथ शिंदे यांचा अंधश्रद्धेवर विश्वास नसेल आणि ते खरोखर पक्षाचे नेते असतील, तर त्यांनी रुपाली चाकणकरांपाठोपाठ दीपक केसरकर यांचा राजीनामा घेतला पाहिजे. शिंदे गटाचे जे जे मंत्री या अघोरी कृत्यात सहभागी आहेत, त्यांच्यावर कारवाई कधी होणार? केवळ छोट्या माशांना पकडून भागणार नाही, मोठ्या माशांनाही बाहेर काढा,” असे आव्हान त्यांनी दिले.

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button