श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला ‘अ’ वर्ग पर्यटन दर्जा

परिसराच्या सर्वागीण विकासाला मोठी गती मिळणार
निलेश राऊत
पुणे: लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला आता ‘अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे या परिसराच्या सर्वागीण विकासाला मोठी गती मिळणार आहे.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरास जिल्हा नियोजन समितीकडून सध्या ‘क’ वर्ग दर्जा प्राप्त आहे. मात्र, या मंदिराची ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरा अत्यंत वैभवशाली असून, येथे दररोज देश-विदेशांतील हजारो भाविक दर्शनासाठी येतात.
समाजसेवा आणि सांस्कृतिक संवर्धनाचेही मोठे केंद्र
हे मंदिर केवळ भक्तीचे स्थान नसून समाजसेवा आणि सांस्कृतिक संवर्धनाचेही मोठे केंद्र आहे. ही बाब लक्षात घेऊन मंदिराला ‘अ’ वर्ग दर्जा देण्याची मागणी कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांनी दि. ४ मार्च २०२५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्यावर ‘पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती या संस्थानाला ‘अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
राज्य सरकारचा निर्णय
या निर्णयामुळे तीर्थक्षेत्र आणि पर्यटनाच्या दृष्टीने या क्षेत्राचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल. असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर जाहीर केले आहे. या निणर्यामुळे पुणेकर आणि गणपती बाप्पांच्या भक्तांनी या निर्णयाचे मोठ्या उत्साहात स्वागत केले आहे. या निर्णयामुळे मंदिराच्या वैभवात अधिक भर पडणार आहे.



