महाराष्ट्र

Pune News : शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार हल्लाबोल

Pune News पुणे, (धनश्री ओतारी) : पुणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत धायरी येथील रखडलेल्या ‘लोकमत प्रेस ते सावित्री गार्डन’ या डीपी (विकास आराखडा) रस्त्याच्या प्रश्नावरून महापालिका प्रशासनाचे धिंडवडे निघाले. नगरसेवक राजाभाऊ लायगुडे यांनी या बैठकीत आक्रमक पवित्रा घेत शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार हल्लाबोल केला. प्रशासनाच्या लालफितीच्या कारभारामुळे आणि अधिकाऱ्यांच्या चालढकल धोरणामुळे नगरसेवकांची मोठी कोंडी होत असल्याचा गंभीर मुद्दा यावेळी लावून धरण्यात आला.https://maharashtramirror.com/ Pune News

दहा वर्षांपासून प्रश्न प्रलंबित
मागील तब्बल दहा वर्षांपासून धायरी, नऱ्हे आणि वडगाव परिसर (नव्याने समाविष्ट गावे) येथील कचरा, पाणी, रस्ते आणि ड्रेनेजलाईनचे गंभीर प्रश्न प्रलंबित आहेत. मागील सहा महिन्यांत प्रशासनाकडून कोणतीही ठोस कामे झालेली नाहीत. तेच तेच विषय पुन्हा समोर येत असूनही प्रशासन ‘ॲक्शन मोड’वर येत नसल्याबद्दल नगरसेवकांनी तीव्र संताप व्यक्त केला. कामे मंजूर असूनही ती मार्गी लावण्यासाठी स्वतः सिटी इंजिनिअर यांच्या कार्यालयात सकाळी ८:३० ते संध्याकाळी ७:३० पर्यंत बसून राहावे लागत आहे. जर असाच कारभार सुरू राहिला, तर पुढील एक महिनाभर शहर अभियंत्यांच्या दालनातच ठिय्या मांडून कामे शिकून घेण्याचा व करून घेण्याचा इशारा राजाभाऊ लायगुडे यांनी दिला. https://maharashtramirror.com/ Pune News

थर्ड क्लास दर्जाचे काम
परिसरात ड्रेनेज आणि रस्त्यांची कामे अत्यंत निकृष्ट (थर्ड क्लास) दर्जाची झाली असल्याचा आरोप यावेळी नगरसेवक लायगुडे यांनी केला. पैसे घेऊन ‘ओके’ रिपोर्ट देणाऱ्या थर्ड पार्टी ऑडिट यंत्रणेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. केवळ कागदी घोडे नाचवणाऱ्या निष्काळजी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करून, त्यांच्या पगारातून दंडाची रक्कम कपात करावी, अशी ठाम मागणी लायगुडे यांनी सभेत केली.

बिल्डर अनधिकृत बांधकामे करून डीपी रस्त्यांमध्ये अडथळा आणत आहेत
स्वतःची दोन वेळा अँजिओप्लास्टी झालेली असतानाही, नागरिकांच्या मूलभूत समस्या सुटाव्यात म्हणून आपण आरोग्याची पर्वा न करता ही तळमळ मांडत असल्याचे लायगुडे यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांशी चर्चा करून डीपी रस्त्यांसाठी जागा ताब्यात घेण्यात आल्या आहेत. परंतु जे बिल्डर अनधिकृत बांधकामे करून डीपी रस्त्यांमध्ये अडथळा आणत आहेत किंवा नागरिकांच्या जिवाशी खेळत आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे. लोकप्रतिनिधी म्हणून अशा कसल्याही बिल्डर लॉबीला पाठीशी घालणार नाही, असा सज्जड दमही त्यांनी भरला.

लायगुडे यांच्या आक्रमक भूमिकेनंतर पथ विभागाचे प्रमुख राजेंद्र बनकर यांनी स्पष्ट केले की, सावित्री गार्डन रस्ता १२०० मीटर लांब आणि ३० मीटर रुंद आहे. रस्त्यामुळे ६० मिळकती बाधित होत असून, त्यापैकी केवळ पाच मालकांनी जागा दिली आहे. त्यामुळे आतापर्यंत अवघा ३०० मीटर रस्ता विकसित झाला आहे. उर्वरित रस्त्यासाठी ३० हजार ४२२ चौरस मीटर जागा ताब्यात घ्यावी लागणार आहे. न्यायालयीन प्रकरण, जागामालकांचा विरोध आणि रस्त्याच्या आखणीवरील आक्षेपांमुळे काम रखडले आहे.’परंतु, वारंवार पाठपुरावा करूनही शहर अभियंता पावसकर यांच्या पातळीवर वेळेत निर्णय होत नसल्याने नगरसेवकांमध्ये तीव्र रोष पसरला आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

पाटबंधारे विभागाची परवानगी (एनओसी) न मिळाल्यामुळे आणि सीआरझेड (CRZ) व प्रशासकीय परवानग्यांअभावी ५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध असूनही टेंडर प्रक्रिया रखडली आहे. महापौरांच्या पाहणी दौऱ्यानंतर चार महिने उलटूनही सल्लागार नेमण्यात आलेला नाही, अशी तांत्रिक कारणे पुढे करत फाइल्सचा वेळेत निपटारा न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर थेट जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करण्यात आली. कोणत्याही फाईलचा निपटारा आठ दिवसांच्या आत व्हावा, तसेच कॅनॉलचे काम आणि प्लॅन कधी सादर होणार याची टाईम-बाउंड डेडलाईन प्रशासनाने द्यावी, अशी मागणी करण्यात आली. https://maharashtramirror.com/ Pune News

लायगुडे यांच्या या आक्रमक भूमिकेला पाठिंबा देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे गटनेते काका चव्हाण, हरिदास चरवड आणि नगरसेविका वर्षा तापकीर यांनीही प्रशासनाला धारेवर धरले. “आम्ही महापालिकेत समाविष्ट होऊन २६ वर्षे झाली, पण आजही मुख्य रस्ता होत नाही. दहा वर्षे नगरसेवक म्हणून काम केल्यानंतर जनता आम्हाला जाब विचारत आहे, त्याची प्रशासनाला जाणीव आहे का?” असा सवाल वर्षा तापकीर यांनी उपस्थित केला.

दरम्यान, आगामी सहा महिन्यांत भूसंपादन करून रस्ता तयार करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले असले, तरी प्रत्यक्षात प्रशासकीय यंत्रणा किती गतिमानतेने काम करते, यावरच नगरसेवकांचापुढील पवित्रा अवलंबून असणार आहे. शहर अभियंत्यांच्या कारभाराविरोधात महापालिका वर्तुळात सध्या मोठी खळबळ उडाली आहे.

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button