मुंबई

Rahul Gandhi : ‘गोकुळ’ दूध संघाच्या वादात राहुल गांधींची उडी; भाजपवर घणाघात करत म्हणाले, ही तर जनादेशाची चोरी आणि मतांवर दरोडा

•निवडणुकीनंतर नियम बदलून संचालक संख्या वाढवल्याप्रकरणी काँग्रेस नेत्याचा तीव्र संताप; शेतकरी कधीही विसरणार नाही असा दिला इशारा

मुंबई :- कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) संचालक मंडळ निवडणुकीनंतर निर्माण झालेल्या राजकीय तणावात आता लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देखील उडी घेतली आहे. राज्य सरकारने गोकुळ दूध संघात शासन नियुक्त संचालक नेमण्याचा घेतलेला निर्णय आणि त्यानंतर बदललेल्या नियमांवरून राहुल गांधी यांनी भारतीय जनता पक्षावर अत्यंत कठोर शब्दांत टीका केली आहे. सामाजिक माध्यमावर पोस्ट करत त्यांनी हा प्रकार म्हणजेच दूध उत्पादकांच्या मतांची चोरी आणि जनादेशात केलेली भेसळ असल्याचे म्हटले आहे.

निवडणुकीनंतर नियम बदलल्याचा गंभीर आरोप

राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत दूध उत्पादकांनी भाजपचा पराभव केला होता. मात्र, त्यानंतर सत्ता टिकवण्यासाठी भाजपने निवडणुकीनंतर थेट नियमच बदलून टाकले. चार संचालक बळोबरीने घुसून 12 वरून संख्या 16 केली आणि बहुमतावर डोळा ठेवून बहुमत चोरले, असा गंभीर आरोप त्यांनी केला. सत्ता राखण्यासाठी सत्ताधारी पक्ष कोणत्याही थराला जाऊ शकतो, अशी टीका करत त्यांनी या निर्णयामुळे सहकार क्षेत्रातील लोकशाही धोक्यात आल्याचे संकेत दिले.

“शेतकरी कधीही विसरत नाही” – थेट इशारा

दूध उत्पादक आणि शेतकऱ्यांच्या मतांवर असा दरोडा टाकणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की, शेतकरी कधीही घडलेला प्रकार विसरत नाही, असा सज्जड दमही राहुल गांधी यांनी दिला. गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून आणि गणपूर्तीवरून कोल्हापुरात आधीच मोठे ‘लेटर वॉर’ व राजकीय संघर्ष सुरू असताना, आता राष्ट्रीय स्तरावरील नेत्याने या प्रकरणात लक्ष घातल्यामुळे या वादाची व्याप्ती आणखी वाढली असून राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे.

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button