चेंबूरमध्ये 'टँकर माफिया'चा हैदोस! वाहन उभे करण्यासाठी 500 रुपयांची खंडणी; आरसीएफ पोलिसांकडून दोघांवर गुन्हा दाखल
•माहुल आणि गडकरी खाण परिसरातील टँकरचालक दहशतीखाली | विरोध केल्यास ठार मारण्याची धमकी | हितेंद्र ठाकूर आणि इम्रान हुसेन यांच्या विरोधात कारवाई
1 मिनिट वाचन

•माहुल आणि गडकरी खाण परिसरातील टँकरचालक दहशतीखाली | विरोध केल्यास ठार मारण्याची धमकी | हितेंद्र ठाकूर आणि इम्रान हुसेन यांच्या विरोधात कारवाई
मुंबई (चेंबूर) :-मुंबईतील चेंबूर परिसरात असलेल्या बीपीसीएल (BPCL) आणि एचपीसीएल (HPCL) सारख्या तेल कंपन्यांच्या बाहेर उभ्या राहणाऱ्या टँकरचालकांकडून दररोज 500 रुपयांची अवैध वसुली केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी आरसीएफ पोलिसांनी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पोलीस आता या टोळीच्या मुळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत.
नेमकं प्रकरण काय?
चेंबूरमधील माहुल गाव आणि गडकरी खाण परिसरात मोठ्या तेल आणि गॅस कंपन्या आहेत. या कंपन्यांमध्ये कच्चा मालाची ने-आण करण्यासाठी दररोज शेकडो टँकर या भागात येतात. पार्किंगसाठी पुरेशी जागा नसल्याने अनेक टँकर रस्त्यालगत उभे असतात. याच संधीचा फायदा घेत काही स्थानिक माफिया टँकरचालकांकडून 'पार्किंग'च्या नावाखाली दिवसाला 500 रुपये खंडणी उकळत असल्याचे समोर आले आहे.
ठार मारण्याची धमकी आणि पोलिसात तक्रार
गेल्या गुरुवारी एका टँकरचालकाने पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला असता, आरोपींनी त्याला अमानुष मारहाण करत ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकारानंतर चालकाने ही बाब आपल्या मालकाच्या कानावर घातली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन टँकर मालकाने तातडीने आरसीएफ पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.
गुन्हा दाखल झालेले आरोपी
1) हितेंद्र ठाकूर
2) इम्रान हुसेन
टँकरचालकांची सुरक्षा धोक्यात
गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरात अशा प्रकारे पैसे उकळले जात असल्याची तक्रार चालकांनी केली आहे. जे चालक पैसे देण्यास नकार देतात, त्यांना धमकावणे किंवा त्यांच्या गाड्यांचे नुकसान करण्याचे प्रकार घडत होते. आता पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याने टँकरचालकांनी सुटकेचा निश्वास टाकला असून, या माफियांवर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.




