सुधारित पार्किंग धोरण अंतिम टप्प्यात
शहरातील पाच रस्त्यांवर 'पे अँड पार्क'; लक्ष्मी रोड, विमाननगर रस्त्यासाठीची निविदा आचारसंहितेनंतर स्थायी समितीपुढे
2 मिनिट वाचन

शहरातील पाच रस्त्यांवर 'पे अँड पार्क'; लक्ष्मी रोड, विमाननगर रस्त्यासाठीची निविदा आचारसंहितेनंतर स्थायी समितीपुढे
निलेश राऊत
पुणे: महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने मान्यता देऊनही सात वर्षांपासून पार्किंग धोरण कागदावर राहिले आहे. या पार्किंग धोरणात बदल करून आता सुधारित पार्किंग धोरण तयार करण्याचे काम सुरू असून ते अंतिम टप्प्यात आहे. पुणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधानपरिषदेची निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर हे सुधारित धोरण पालिकेच्या स्थायीमार्फत सर्वसाधारण सभेसमोर मंजुरीसाठी ठेवणार आहे.

शहरातील वाहनांची वाढती संख्या रोखण्याबरोबरच कोंडी सोडविण्याच्या नावाखाली शहरातील रस्त्यांवर 'पे अॅण्ड पार्क' धोरण राबविण्याचा घाट महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी प्रशासनाने २३ मार्च २०१८ मध्ये घातला होता. याला भाजप वगळता सर्व विरोधी पक्ष आणि विविध समाजसेवी संस्थांनी विरोध करत जोरदार आंदोलने केली. पुणेकरांची वाढती नाराजी लक्षात घेऊन प्रस्ताव मागे न घेता उपसूचना देऊन प्रमुख पाच रस्त्यांवर प्रायोगिक तत्त्वावर सहा महिन्यांसाठी ही योजना राबविण्याचा मार्ग सत्ताधाऱ्यांनी अवलंबला.
३८ रस्त्यांचा सर्व्हे करून त्यातील पाच रस्ते निवडण्याचा प्रस्ताव
हे पाच रस्ते निवडण्याचा अधिकार महापौरांच्या अध्यक्षतेखालील समितीला देण्यात आला. त्यानंतर पालिका प्रशासनाने शहरातील जवळपास ३८ रस्त्यांचा सर्व्हे करून त्यातील पाच रस्ते निवडण्याचा प्रस्ताव महापौर कार्यालयास दिला होता. या प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी पालिका आयुक्तांनी अनेक स्मरणपत्रे दिली. मात्र, विविध निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून गेली सात वर्षे या प्रस्तावावर काहीच कार्यवाही करण्यात आली नाही.
प्रायोगिक तत्त्वावर 'पे अँड पार्क'ची निविदा
सहा रस्त्यांवर प्रायोगिक तत्त्वावर 'पे अँड पार्क'ची निविदा काढण्यात आली आहे. त्यात जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन रस्ता, लक्ष्मी रस्ता, बिबवेवाडी, बालेवाडी हायस्ट्रीट, विमाननगर या रस्त्यांचा समावेश आहे. 'पे अँड पार्क' करिता निश्चित करण्यात आलेले दर शुल्क दुचाकी ४ रुपये आणि चारचाकी २० रुपये प्रतितास आकारण्यात येणार आहे. हे प्रकल्प विभागाकडील मक्ता पद्धतीने चालविण्यात येणाऱ्या वाहनतळाचे दर दुचाकी ३ रुपये आणि चारचाकी १४ रुपये प्रतितास यापेक्षा जास्त असल्याने नागरिक वाहनतळाचा जास्त वापर करतील, या उद्देशाने निविदा प्रक्रिया राबविण्यात आली.
दोनदा फेरनिविदा काढली
पण, प्रतिसाद न मिळाल्यामुळे दोनदा फेरनिविदा काढण्यात आली. आता या निविदेला प्रतिसाद मिळाला आहे. त्यात जंगली महाराज रस्ता आणि फर्ग्युसन रस्ता यासाठी पे अँड पार्कची एकच निविदा काढली होती. ही निविदा पूर्वगणनपत्रकापेक्षा तब्बल ६७ टक्के कमी दराने तर लक्ष्मी रस्तावरील पे अँड पार्कची निविदा पूर्वगणनपत्रकापेक्षा ३९.९९ टक्के कमी दराने आली होती. बालेवाडी हायस्ट्रीट रस्त्यासाठी ६९ टक्के कमी तर विमाननगर रस्त्यावरील पे अँड पार्कची निविदा ३६.३७ टक्के कमी दराने आली होती. बालेवाडी हायस्ट्रीट, जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन रस्ता यासाठी फेरनिविदा काढण्यात आली.
पुणे न्यूज




