Mumbai News : राज ठाकरेंचे वक्तव्य म्हणजे ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ : भाजप नेते प्रवीण दरेकर
Mumbai News : मुंबई, महाराष्ट्र मिरर : आगामी काही महिन्यांत देशात मोठी राजकीय उलथापालथ होईल आणि एक वेळ अशी येऊ शकते की देशाला पंतप्रधानच नसेल, या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी जोरदार पलटवार केला आहे.
1 मिनिट वाचन

Mumbai News : मुंबई, महाराष्ट्र मिरर : आगामी काही महिन्यांत देशात मोठी राजकीय उलथापालथ होईल आणि एक वेळ अशी येऊ शकते की देशाला पंतप्रधानच नसेल, या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी जोरदार पलटवार केला आहे. राज ठाकरे यांचे वक्तव्य म्हणजे ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ असल्याचा टोला दरेकर यांनी लगावला.https://maharashtramirror.com/ Mumbai News
एका वृत्तवाहिनीशी बोलताना दरेकर यांनी राज ठाकरे यांच्या यापूर्वीच्या वक्तव्यांचाही उल्लेख केला. “गणपती उत्सवाच्या वेळी अशा प्रकारची दंगल होईल, असे त्यांना वाटले होते. नवरात्रोत्सवातही त्यांनी अशाच प्रकारचे भाकीत केले होते. राम मंदिराच्या वेळीही ठाकरे बंधूंना त्या ठिकाणी दंगे होतील असे वाटत होते. मात्र, राम मंदिराचे लोकार्पण निर्विघ्नपणे झाले आणि सर्व उत्सव सुरळीत पार पडले,” असे दरेकर म्हणाले.
राज ठाकरे यांनी अशा प्रकारची वक्तव्ये करत राहावीत, असे सांगत दरेकर यांनी त्यांची खिल्ली उडवली. “यावर सध्या ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ एवढेच बोलावेसे वाटते. त्यांनी अशी स्वप्ने पाहत राहावीत,” असा टोला त्यांनी लगावला.
राज ठाकरे नेमके काय म्हणाले होते?
देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना राज ठाकरे यांनी पुढील चार ते पाच महिन्यांत देशात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली होती. देशात काहीतरी मोठी गडबड होऊ शकते आणि एका टप्प्यावर देशाला पंतप्रधानच नसण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते, असे भाकीत त्यांनी केले होते.
सरकारकडून चुका सुरू राहिल्यास देशभरातील नागरिक रस्त्यावर उतरले तरी आश्चर्य वाटणार नाही, असेही राज ठाकरे यांनी म्हटले होते. दसरा मेळाव्यांमध्ये झालेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांबाबत विचारले असता, आपण हे मेळावे पाहिले नसल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. राजकारणात टीका-टिप्पणी होतच राहणार; मात्र सध्याच्या परिस्थितीवर बोलणे आवश्यक असल्याची भूमिकाही त्यांनी मांडली होती.




