Pune Accident News : बोपदेव घाटातील भीषण अपघातप्रकरणी टेम्पोचालक अटकेत
Pune Accident News : भरधाव आयशर टेम्पोची कारला आणि बसस्टॉपवरील विद्यार्थ्यांना धडक; विद्यार्थ्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याचा आरोप
2 मिनिट वाचन

Pune Accident News : पुणे, महाराष्ट्र मिरर : बोपदेव घाटातील उतारावर भरधाव आणि बेदरकारपणे आयशर टेम्पो चालवून कारला तसेच बसस्टॉपवर उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांना धडक देणाऱ्या चालकाला कोंढवा, बु. येवलेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. प्रतीक मारुती चव्हाण (वय २२, रा. भुलेश्वर गाव, माळशिरस, ता. पुरंदर, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे.
२५ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी दीडच्या सुमारास बोपदेव घाटात ट्रिनिटी कॉलेजसमोरील सार्वजनिक रस्त्यावर आणि येवलेवाडी येथील बसस्टॉपजवळ हा अपघात झाला. आयशर टेम्पो चालकाला घाटरस्त्याची आणि उताराची माहिती असतानाही त्याने वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालविल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टेम्पो चालकाला भरधाव वेगामुळे अपघात होऊन एखादी व्यक्ती जखमी होऊ शकते किंवा तिचा मृत्यू होऊ शकतो, याची जाणीव होती. तरीही त्याने उतारावरून टेम्पो वेगाने चालवला. या दरम्यान टेम्पोने फिर्यादी ओमकार चंद्रकांत कटके (वय २८, रा. भिवरी, ता. पुरंदर) यांच्या कारला डाव्या बाजूने धडक दिली. त्यानंतर बसस्टॉपवर उभ्या असलेल्या सिद्धेश राजे (वय २०), विशाल दांगडे (वय २१) आणि मोहिनी चौधरी (वय २०) यांनाही जोरदार धडक दिली.
या प्रकरणी ओमकार कटके यांनी कोंढवा बु. येवलेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार भारतीय न्याय संहितेची कलमे १०५, १२५(ख), २८१, ३२४(४) तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ आणि ११९/१७७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या अपघातात विद्यार्थ्यांच्या मृत्यूला टेम्पोचालक कारणीभूत ठरल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तसेच अन्य दोन विद्यार्थ्यांनाही जखमी केल्याचा आरोप आहे. अपघातात कारचेही नुकसान झाले.
आरोपी प्रतीक चव्हाण याला अटक करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आकाश विटे करीत आहेत.
https://epaper.maharashtramirror.com/

hey, i am vikrant kulkarni news and video editor of maharashtra mirror news paper




