PMC News : महापालिकेचे १० लाखांचे 'फूड टेस्टिंग मशिन' गायब; आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर
पुणे, महाराष्ट्र मिरर
2 मिनिट वाचन

PMC News : महापालिकेने सन २०१६-१७ मध्ये लाखो रुपये खर्चून खरेदी केलेले एक 'फूड टेस्टिंग मशिन' सध्या प्रयोगशाळेतच उपलब्ध नसल्याची खळबळजनक माहिती समोर
पुणे, महाराष्ट्र मिरर
PMC News : महापालिकेच्या आरोग्य विभागाचा कारभार किती विस्कळीत आणि बेजबाबदार असू शकतो, याचे धक्कादायक उदाहरण नुकतेच समोर आले आहे. महापालिकेने सन २०१६-१७ मध्ये लाखो रुपये खर्चून खरेदी केलेले एक 'फूड टेस्टिंग मशिन' सध्या प्रयोगशाळेतच उपलब्ध नसल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. सार्वजनिक मालमत्तेची अशी 'धुळधाण' झाल्यामुळे आता या प्रकरणी पोलीस तक्रारीची प्रक्रिया सुरू झाली असली, तरी जबाबदारी कोणाची, असा संतप्त प्रश्न उपस्थित केला जात आहे. (pmc News food testing machin scam)

महापालिकेच्या जुलै महिन्याच्या मुख्यसभेत नगरसेवक महेश वाबळे यांनी आरोग्य विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा एक तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यांनी महापालिकेच्या फूड टेस्टिंग मशिनच्या सद्यस्थितीबाबत आणि मशीनच्या सर्व भागांच्या उपलब्धतेबाबत प्रशासनाकडे लेखी खुलासा मागितला होता. या प्रश्नाला दिलेल्या उत्तराने सभागृहातच नव्हे, तर पालिका वर्तुळात खळबळ उडवून दिली.

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सन २०१६-१७ मध्ये आरोग्य विभागाने निविदा प्रक्रिया राबवून 'फिवेग रॉ-फायबर एक्स्ट्रॅक्शन सिस्टीम' कंपनीचे एक अत्याधुनिक फूड टेस्टिंग मशिन ९ लाख ९८ हजार रुपये खर्च करून खरेदी केले होते. सुरुवातीला हे मशिन संयुक्त प्रकल्पांतर्गत 'फूड हायजीन अँड हेल्थ लॅबोरेटरी' या प्रयोगशाळेला वापरासाठी देण्यात आले होते. (PMC News)
करार संपला अन् मशिन बेपत्ता झाले
प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, संबंधित प्रयोगशाळेचा करार १ फेब्रुवारी २०१८ रोजी संपुष्टात आला. त्यानंतर नियमानुसार प्रयोगशाळेतील सर्व उपकरणांचा ताबा तत्कालीन व्हेटरनरी सुपरिंटेंडंट (पशुवैद्यकीय अधीक्षक) यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला होता. या ताबा यादीमध्ये फूड टेस्टिंग मशिनचाही समावेश असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मात्र, अलीकडेच जेव्हा आरोग्य विभागाने या मशिनची प्रत्यक्ष पाहणी केली, तेव्हा ते मशिन प्रयोगशाळेत आढळून आले नाही. (PMC News)
Crime Newsपॅरोलवर सुटलेला फरार आरोपी ताब्यात
केवळ मशिनच नाही, तर मशिनचा एक महत्त्वाचा भागही गायब असल्याचे तपासणीत समोर आले आहे. प्रशासनाने यावर सारवासारव करताना, "संबंधित प्रयोगशाळा २०१९ ते २०२२ या काळात बंद असल्याने आणि मशिनचे स्पेअर पार्टस साधारणपणे एका वर्षापर्यंतच टिकत असल्याने ते नष्ट झाले असावेत," असा विचित्र युक्तिवाद केला आहे. मात्र, संपूर्ण यंत्रच गायब होणे हे केवळ तांत्रिक कारण नसून, हा मोठा प्रशासकीय निष्काळजीपणा असल्याचे स्पष्ट होत आहे.

१० लाखांची सार्वजनिक मालमत्ता अशी बेवारसपणे गायब झाल्याने प्रशासनाने आता हात वर करत पोलीस तक्रारीचा मार्ग स्वीकारला आहे. संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे. मात्र, प्रशासन केवळ तक्रार दाखल करण्यावरच भर देत आहे, मूळ गुन्हेगार किंवा त्यासाठी जबाबदार अधिकारी कोण, याची माहिती देण्यास मात्र प्रशासन टाळाटाळ करत आहे. (PMC News)
Katraj-Kondhwa Road : कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणाची मुदत पुन्हा लांबणीवर
जनतेच्या करातून उभा राहिलेल्या रकमेतून खरेदी केलेले यंत्र सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी ज्या विभागाची होती, त्या विभागाच्या कारभारावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. "केवळ पोलीस तक्रार करून जबाबदारी झटकता येणार नाही का? इतक्या वर्षांपासून हे मशिन गायब असताना प्रशासनाला जाग कशी आली नाही?" असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. महापालिकेतील भ्रष्टाचाराची आणि कारभारातील अनागोंदीची ही एक नवी 'मशिन गायब' केस असल्याचे बोलले जात असून, याप्रकरणी कडक चौकशीची मागणी जोर धरत आहे.
View this post on Instagram A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)




