Thane News : जनगणना पहिल्या टप्प्यातील शिक्षकांचे थकीत मानधन दिवाळीपूर्वी द्या; उल्हासनगर पालिकेला काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा
•हलगर्जीपणा आणि विलंबाबाबत पालिका प्रशासनाला धारेवर धरत रविकांत आपटे यांची टीका; मानधन न मिळाल्यास पालिका मुख्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा
1 मिनिट वाचन

•हलगर्जीपणा आणि विलंबाबाबत पालिका प्रशासनाला धारेवर धरत रविकांत आपटे यांची टीका; मानधन न मिळाल्यास पालिका मुख्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा
ठाणे, उल्हासनगर :- भारतातील पहिल्या टप्प्यातील जनगणना (घरगणना) अतिशय यशस्वीरीत्या पार पाडणाऱ्या शिक्षकांचे थकीत मानधन अद्याप न मिळाल्याने उल्हासनगर महानगरपालिका प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उन्हाळ्याच्या सुट्ट्या, कुटुंब आणि वैयक्तिक कामांचा विचार न करता ऊन-पावसात दिवस-रात्र काम करून जनगणनेचा पहिला टप्पा पूर्ण केला होता. मात्र, शासनाकडून प्राप्त झालेला मानधनाचा निधी काही शिक्षकांच्या खात्यात अद्यापही न पोहोचल्याने हा निधी गेला कुठे आणि या विलंबासाठी जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
पालिका प्रशासनाकडून शिक्षकांचीच अडवणूक
उल्हासनगर महानगरपालिकेच्या संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे अनेक शिक्षकांना त्यांच्या हक्काच्या मानधनापासून वंचित राहावे लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मानधन दिले नसताना उलट शिक्षकांनाच पालिकेच्या फेऱ्या मारायला लावल्या जात आहेत, तसेच पैसे खात्यावर जमा झाले की नाही हे तपासण्यासाठी 6-6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट मागवून शिक्षकांची नाहक अडवणूक व अपमान केला जात असल्याचा दावा काँग्रेसतर्फे करण्यात आला आहे. पालिकेच्या या कारभारावर कडक शब्दांत ताशेरे ओढण्यात आले आहेत.
दिवाळीपूर्वी मानधन न दिल्यास महामोर्चाचा इशारा
सध्या सणासुदीचे आणि दिवाळीचे दिवस जवळ आले असल्याने जनगणना कार्यात सहभागी राहिलेल्या सर्व उर्वरित शिक्षकांचे थकीत मानधन तातडीने त्यांच्या खात्यात जमा करण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कोकण विभाग अध्यक्ष रविकांत आपटे यांनी केली आहे. प्रशासनाने यावर तात्काळ तोडगा न काढल्यास सर्व शिक्षक संघटना आणि शिक्षकांना सोबत घेऊन उल्हासनगर महानगरपालिकेसमोर प्रचंड मोठे जनआंदोलन व मोर्चा उभारला जाईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे.




