आता पक्षात मतभेद नको, आतला-बाहेरचा वाद नको
राष्ट्रहिताबरोबर पक्षाच्या विचारधारेला प्राधान्य द्या; भाजपच्या नेत्यांकडून नगरसेवकांची कानउघाडणी
1 मिनिट वाचन

राष्ट्रहिताबरोबर पक्षाच्या विचारधारेला प्राधान्य द्या; भाजपच्या नेत्यांकडून नगरसेवकांची कानउघाडणी
नगरसेवक, आमदार आणि पक्ष पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय वाढविण्यासाठी दोन दिवसांचे नारायणपूर निवासी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे
निलेश राऊत
पुणे: भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नगरसेवकांमध्ये मतभेद नको. ज्या भागात पक्षाची ताकद नाही त्या ठिकाणी पक्षात बाहेरचे लोक घेऊन पक्षाची ताकद वाढविली जाते. त्यामुळे पक्षात आतला आणि बाहेरचा वाद नको. राष्ट्रहिताबरोबर पक्षाच्या विचारधारेला प्राधान्य द्या. पक्षवाढीवर भर दिला पाहिजे, असा कानमंत्र विविध मान्यवरांनी भाजप नगरसेवकांना दिला.

महापालिकेतील भाजपचे नगरसेवक, आमदार आणि पक्ष पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय वाढविण्यासाठी भाजपकडून दोन दिवसांचे नारायणपूर निवासी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराला सोमवारी सकाळी ११ वाजता सुरुवात झाली. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार योगेश टिळेकर, सुनील कर्जतकर, भारत आमदापुरे, रवींद्र साठे, समीर गुरव, महेश मानेकर यांनी या शिबिरात मार्गदर्शन केले. यावेळी नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, हेमंत रासने, सुनील कांबळे, महापौर मंजुषा नागपुरे, सभागृहनेते गणेश बिडकर, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांच्यासह भाजपचे सर्व नगरसेवक, मंडल अध्यक्ष, सरचिटणीस आदी उपस्थित होते.
जे आहे ते स्वीकारले पाहिजे
पक्ष संघटना आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय राहावा यादृष्टीने मार्गदर्शन करण्यात आले. भाजपच्या धेय्य धोरणानुसार, विचारधारेनुसार नागरिकांच्या कामाला प्राधान्य द्यावे. पक्षवाढीवर भर दिला पाहिजे. पक्षाची ज्या भागात ताकद नाही तिथे आपण अन्य पक्षातील लोक भाजपमध्ये घेतो. त्यामुळे आतले आणि बाहेरचे वाद नको. जे आहे ते स्वीकारले पाहिजे. पक्षवाढीवर भर दिला पाहिजे. मतभेद बाजूला ठेवले पाहिजेत. राष्ट्रहिताबरोबर पक्षाच्या विचारधारेला प्राधान्य द्या, असे सांगितले.




