Naigaon Crime News : नायगाव रेल्वे स्थानक परिसरातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या नराधमाला अटक; 120 सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
•कॅबमध्ये प्रवासादरम्यान मुलीशी अश्लील चाळे करणाऱ्या 50 वर्षीय 'रामरक्षा मौर्या'ला ठोकल्या बेड्या; नायगाव पोलिसांची मोठी कामगिरी
1 मिनिट वाचन

•कॅबमध्ये प्रवासादरम्यान मुलीशी अश्लील चाळे करणाऱ्या 50 वर्षीय 'रामरक्षा मौर्या'ला ठोकल्या बेड्या; नायगाव पोलिसांची मोठी कामगिरी
नायगाव (पालघर) :- कॅबमधून प्रवास करणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या 50 वर्षीय नराधमाला नायगाव पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. 12 मार्च 2026 रोजी सायंकाळीच्या सुमारास पीडित मुलगी चिंचोटी नाका ते नायगाव रेल्वे स्टेशन या मार्गाने कॅबमधून जात असताना हा धक्कादायक प्रकार घडला होता. या प्रकरणी पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे रामरक्षा मिठाईलाल मौर्या याला बेड्या ठोकल्या असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
तपासाचे चक्र आणि 120 सीसीटीव्ही फुटेज
घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेची दोन पथके तयार केली होती. आरोपीचा कोणताही सुगावा नसताना पोलिसांनी चिंचोटी नाका ते नायगाव रेल्वे स्टेशन आणि विलेपार्ले रेल्वे स्थानकापर्यंतच्या परिसरातील सुमारे 120 सीसीटीव्ही फुटेज बारकाईने तपासले. या तपासात संशयित इसमाचे छायाचित्र हाती लागले. मिळालेल्या फोटोंच्या आधारे आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी नायगाव पूर्व येथील आशानगर परिसरातून रामरक्षा मौर्या याला ताब्यात घेतले.
नेमकी घटना आणि कारवाई
पीडित मुलगी कॅबमध्ये बसलेली असताना आरोपीने बोलण्याच्या बहाण्याने तिच्याशी शारीरिक लगट केली आणि वारंवार अश्लील स्पर्श करून तिचा विनयभंग केला. या प्रकारामुळे मुलीच्या मनास लज्जा उत्पन्न झाल्याने तिने नायगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तात्काळ भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 74,75,78,79 आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (POCSO) कलम 8,12 अन्वये गुन्हा नोंदवला होता. अटक करण्यात आलेला आरोपी मूळचा उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातील असून तो सध्या नायगावमध्ये चालक म्हणून काम करत होता.
पोलीस पथकाची यशस्वी कामगिरी
ही यशस्वी कारवाई मीरा-भाईंदर, वसई-विरारचे पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उप आयुक्त पौर्णिमा चौगुले आणि सहाय्यक पोलीस आयुक्त नवनाथ घोगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तपास पथकात वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे, विजय कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश केकान, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर आसबे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा समावेश होता. या कारवाईमुळे नायगाव परिसरात महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेबाबत पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक होत आहे.




