कोरेगाव पार्क–कल्याणी नगर–मुंढवा परिसरातील वाहतूक कोंडीसाठी उपाययोजनांना गती
श्रीनाथ भिमाले आणि नवल किशोर राम यांनी नियोजित वाहतूक प्रकल्पांची पाहणी केली
1 मिनिट वाचन

श्रीनाथ भिमाले आणि नवल किशोर राम यांनी नियोजित वाहतूक प्रकल्पांची पाहणी केली
निलेश राऊत
पुणे: कोरेगाव पार्क–कल्याणी नगर–मुंढवा परिसरात वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी विविध उपाययोजनांना गती देत असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली.

स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले आणि महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी मंगळवारी या परिसरातील नियोजित वाहतूक प्रकल्पांची पाहणी केली. शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर, माधव जगताप, मनीषा शेकटकर, नगरसेवक उमेश गायकवाड यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
भिमाले म्हणाले, "शहरातील कोरेगाव पार्क, कल्याणी नगर, मुंढवा आणि केशवनगर परिसरात वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत असून, नागरिकांना दररोज मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. आयटी पार्क, नव्या निवासी प्रकल्पांची वाढ आणि रस्त्यांची अपुरी क्षमता यामुळे या भागातील वाहतुकीवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे.
"विशेषतः मुंढवा येथील महात्मा फुले चौक, कल्याणी नगर–कोरेगाव पार्क मार्ग आणि आगाखान ब्रिज परिसर हे मुख्य बॉटलनेक ठरत आहेत. सकाळ व सायंकाळच्या गर्दीच्या वेळी वाहनांच्या लांबलचक रांगा लागून प्रवाशांचा वेळ वाया जात आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेकडून काही महत्त्वाच्या उपाययोजनांना गती देण्यात आली आहे. कल्याणी नगर–कोरेगाव पार्क दरम्यान नवीन नदीवरील पूल उभारण्याचे काम सुरू असून, काही ठिकाणी रस्ता रुंदीकरणही करण्यात येत आहे. तसेच मुंढवा चौकातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सुमारे १२६ कोटी रुपयांच्या फ्लायओव्हर प्रकल्पास मंजुरी देण्यात आली आहे. याशिवाय हडपसर–मुंढवा–केशवनगर मार्गावरही नवीन पूल आणि रस्ते सुधारणा प्रकल्प राबविण्यात येत आहेत."
Measures to ease traffic congestion in Koregaon Park-Kalyani Nagar-Mundhwa area accelerated




