मंगेश जोशी महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाचे नवे संचालक; संचालकपदाचा कार्यभार स्वीकारला
जोशी यांना प्रशासकीय सुधारणा, धोरणात्मक नियोजन आणि प्रशिक्षण क्षेत्रात त्यांचा अनुभव आहे
1 मिनिट वाचन

जोशी यांना प्रशासकीय सुधारणा, धोरणात्मक नियोजन आणि प्रशिक्षण क्षेत्रात त्यांचा अनुभव आहे
मुंबई: महाराष्ट्र शासनाने नुकत्याच केलेल्या प्रशासकीय बदल्यांनुसार, मंगेश जोशी (भा.प्र.से) यांची महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जोशी यांनी मंगळवार (ता. २१) रोजी मुंबई येथील पर्यटन संचालनालयाच्या मुख्यालयात आपल्या पदाचा अधिकृत कार्यभार स्वीकारला.

जोशी हे अनुभवी प्रशासकीय सनदी अधिकारी असून, या नियुक्तीपूर्वी त्यांनी पुणे येथील 'यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी' (यशदा) येथे उपमहासंचालक म्हणून जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे. प्रशासकीय सुधारणा, धोरणात्मक नियोजन आणि प्रशिक्षण क्षेत्रात त्यांचा अनुभव असून, त्यांच्या या अनुभवाचा उपयोग आता राज्याच्या पर्यटन विकासासाठी होणार आहे.
पदभार स्वीकारल्यानंतर मंगेश जोशी म्हणाले, "महाराष्ट्र हे पर्यटनाच्या दृष्टीने समृद्ध राज्य आहे. पर्यटन विभागाच्या विद्यमान धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि राज्यातील पर्यटन स्थळांची जागतिक स्तरावर व्यापक प्रसिद्धी करणे ही प्राथमिकता असेल. महाराष्ट्राला जागतिक पर्यटन नकाशावर एक अग्रगण्य आणि सुरक्षित पर्यटन स्थळ म्हणून नव्याने ओळख मिळवून देण्याचा मानस आहे. तसेच, शाश्वत पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक रोजगाराला चालना देऊन राज्याच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत."
राज्यातील गड-किल्ले, विस्तीर्ण समुद्रकिनारे, निसर्गपर्यटन आणि सांस्कृतिक वारसा जपून आधुनिक सुविधांच्या माध्यमातून पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आगामी काळात विशेष उपक्रम राबवले जातील, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
Mangesh Joshi new Director of Maharashtra Tourism Directorate; assumes charge as Director




