Pune Crime: २९ लाखांच्या लुटीचा बनाव अवघ्या दोन तासांत उघड; कामगारासह साथीदाराला अटक
Pune Crime: पुणे, महाराष्ट्र मिरर : स्टील फर्मची तब्बल २९ लाख २० हजार रुपयांची रोख रक्कम हडपण्यासाठी कामगाराने साथीदाराच्या मदतीने एनआयबीएम रोडवर लुटल्याचा बनाव केल्याचा प्रकार कोंढवा पोलिसांनी अवघ्या दोन तासांत उघडकीस आणला.
2 मिनिट वाचन

Pune Crime: स्टील विक्रीची रक्कम हडपण्यासाठी एनआयबीएम रोडवर लुटल्याची रचली कहाणी; कोंढवा पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे केला पर्दाफाश, २९.५० लाखांचा मुद्देमाल जप्त
Pune Crime: पुणे, महाराष्ट्र मिरर : स्टील फर्मची तब्बल २९ लाख २० हजार रुपयांची रोख रक्कम हडपण्यासाठी कामगाराने साथीदाराच्या मदतीने एनआयबीएम रोडवर लुटल्याचा बनाव केल्याचा प्रकार कोंढवा पोलिसांनी अवघ्या दोन तासांत उघडकीस आणला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि संशयिताच्या चौकशीतून या कथित लुटीचा पर्दाफाश करत दोघांना अटक केली. त्यांच्याकडून २९ लाख २० हजार रुपयांची रोकड आणि दोन मोबाईल असा एकूण २९ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शाकीब अयुब मोमीन (वय २७, रा. सय्यदनगर, हडपसर) आणि सुरेश बिचप्पा पुजारी (वय ३०, रा. रामटेकडी रामनगर, हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०६, ३१६(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.https://maharashtramirror.com/ Pune crime
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मदवाडी येथे राहणाऱ्या २६ वर्षीय स्टील व्यावसायिकाने त्याचा कामगार शाकीब मोमीन याच्याकडे रिटेल विक्रेत्यांकडून मागील तीन महिन्यांच्या स्टील बिलांची जमा झालेली २९ लाख २० हजार रुपयांची रोख रक्कम फर्मकडे जमा करण्याची जबाबदारी दिली होती. २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी सातच्या सुमारास शाकीबने मालकाला फोन करून एनआयबीएम रोडवर एका व्यक्तीने आपला रस्ता अडवून मारहाण केली आणि पैशांची बॅग व मोबाईल हिसकावून नेल्याचे सांगितले. व्यावसायिकाने तत्काळ एनआयबीएम रोडवरील एव्हरजॉय सोसायटीसमोर जाऊन शाकीबला सोबत घेतले आणि तक्रार देण्यासाठी कोंढवा पोलीस ठाणे गाठले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास पथकाला तातडीने कारवाईचे आदेश दिले. पोलिसांनी शाकीबकडे घटनेबाबत सविस्तर चौकशी केली आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावेळी शाकीबच्या कथनाबाबत पोलिसांना संशय आला. https://maharashtramirror.com/ Pune Crime
पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी केली असता कथित लुटीची संपूर्ण कहाणी बनावट असल्याचे समोर आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. स्टील बिलातून जमा झालेली २९ लाख २० हजार रुपयांची रोकड हडपण्यासाठी साथीदार सुरेश पुजारी याच्याशी संगनमत करून अज्ञात व्यक्तीने आपल्याला लुटल्याचा बनाव केल्याची कबुली शाकीबने दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी शाकीबला सोबत घेऊन रामटेकडीतील रामनगर परिसरात सुरेश पुजारीच्या घराजवळ धाव घेतली. तेथे सुरेश पैशांच्या बॅगसह मिळून आल्याचे पोलिसांनी सांगितले. बॅगेतून २९ लाख २० हजार रुपयांची रोख रक्कम तसेच ३० हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन असा एकूण २९ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यानंतर दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली.https://maharashtramirror.com/ Pune crime
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर, सहायक पोलीस आयुक्त रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस, पोलीस निरीक्षक प्रशांत मंडले, संतोष चौधरी तसेच कोंढवा पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने केली




