Kashigaon Crime News : 50 कोटींच्या गुंतवणुकीचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक; काशिगाव पोलिसांच्या गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई
• बनावट 'अंगडिया' पावती आणि डॉलरच्या पेमेंटचा बनाव रचून लुटले 34 लाख; सराईत 'बाबा यादव'सह मुंबईचा साथीदार जेरबंद
2 मिनिट वाचन

•बनावट 'अंगडिया' पावती आणि डॉलरच्या पेमेंटचा बनाव रचून लुटले 34 लाख; सराईत 'बाबा यादव'सह मुंबईचा साथीदार जेरबंद
काशिगाव :- एका बाजूला उद्योगांत कोट्यवधींच्या गुंतवणुकीचे स्वप्न दाखवायचे आणि दुसऱ्या बाजूला तांत्रिक प्रक्रियेच्या नावाखाली उद्योजकांकडूनच लाखो रुपये उकळायचे, असा धक्कादायक प्रकार काशिगाव परिसरात उघडकीस आला आहे. 'एकता एक्सप्रेस प्रा. लि.' या कंपनीत तब्बल 50 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून एका टोळीने व्यावसायिकाला 34 लाख 20 हजार रुपयांचा गंडा घातला. मात्र, ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष-4 च्या पथकाने या प्रकरणाचा छडा लावत उत्तर प्रदेशातील सराईत गुन्हेगारासह त्याच्या मुंबईतील साथीदाराला बेड्या ठोकल्या आहेत.
या फसवणुकीचा कट अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने रचण्यात आला होता. विनोद यादव ऊर्फ बाबा यादव, दिलीप मागतोरा आणि राज या त्रिकुटाने ऑगस्ट 2025 पासून फिर्यादींशी संपर्क साधला. आपली मोठी आर्थिक क्षमता असल्याचे भासवण्यासाठी त्यांनी 28 लाख अमेरिकन डॉलर्सची बनावट 'स्विफ्ट पेमेंट' रिसिप्ट आणि अंगडियाची खोटी पावती तयार केली. या कागदपत्रांच्या आधारे फिर्यादींचा विश्वास संपादन केल्यानंतर, गुंतवणुकीच्या व्यवहारासाठी लागणारा खर्च आणि इतर तांत्रिक बाबींच्या नावाखाली त्यांनी फिर्यादींकडून वेळोवेळी 34 लाख 20 हजार रुपये रोखीने आणि बँक ट्रान्सफरद्वारे लाटले.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस आयुक्त निकेत कौशिक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष-4 कडे हा तपास सोपवण्यात आला. प्रभारी पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे उत्तर प्रदेशातील भदोई येथून विनोदकुमार आसाराम यादव आणि मुंबईतून दिलीप इंदुकुमार मागतोरा या दोघांना ताब्यात घेतले. पोलीस कोठडीदरम्यान केलेल्या कसून चौकशीत आरोपींनी गुन्हा कबूल केला असून, त्यांच्याकडून फसवणुकीची 34 लाख 20 हजार रुपयांची संपूर्ण रक्कम हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
मुख्य आरोपी विनोद यादव हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी मुंबईतील समतानगर आणि दादर पोलीस ठाण्यासह ठाण्यातील कासारवडवली पोलीस ठाण्यातही फसवणुकीचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. या टोळीने अशाच प्रकारे आणखी किती सामान्य नागरिकांना गुंतवणुकीच्या नावाखाली गंडा घातला आहे, याचा सखोल तपास आता पोलीस करत आहेत. या कामगिरीबद्दल पोलीस पथकाचे सर्वत्र कौतुक होत असून, अशा बनावट गुंतवणूकदारांपासून व्यावसायिकांनी सावध राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
हेही वाचा: Ram Navmi 2026 : मर्यादा पुरुषोत्तम राम: आदर्शांच्या उजळणीचा मंगल सोहळा




