उपनगरांमध्ये मेट्रो विस्ताराला सर्वसाधारण सभेत मंजुरी
चार नवीन मेट्रो विस्तार प्रस्तावांना राज्य सरकारकडे पाठविणार
1 मिनिट वाचन

चार नवीन मेट्रो विस्तार प्रस्तावांना राज्य सरकारकडे पाठविणार
निलेश राऊत
पुणे: शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर मेट्रोचे जाळे उपनगर आणि बाह्य भागांपर्यंत वाढवण्याचा महत्त्वाचा निर्णय महापालिका सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. नगरसेवकांनी मांडलेल्या उपसूचनांद्वारे चार नवीन मेट्रो विस्तार प्रस्तावांना एकमताने मंजुरी देऊन, हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे.

सध्या पुणे मेट्रो प्रकल्पांतर्गत केवळ दोन मार्ग कार्यरत असून, उर्वरित मार्ग विविध टप्प्यांवर प्रलंबित आहेत. या पार्श्वभूमीवर भविष्यातील वाहतुकीचा ताण लक्षात घेऊन मेट्रो नेटवर्क शहराच्या हद्दीबाहेर नेण्याची मागणी जोर धरू लागली आहे. सभागृहाने मंजूर केलेल्या प्रस्तावांनुसार कात्रज ते खेड शिवापूर टोलनाका, खडकवासला ते डोणजे, वाघोली ते लोणीकंद आणि कात्रज ते उंड्री असे चार नवीन मार्ग प्रस्तावित करण्यात आले आहेत. या विस्तारांमुळे मेट्रो सेवा शहराबाहेर २० किलोमीटरपर्यंत वाढवण्याचा प्रयत्न होणार आहे.
नगरसेविका वर्षा तापकीर यांनी स्वारगेट-कात्रज मार्ग पुढे खेड शिवापूरपर्यंत नेण्याचा प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावाला स्थायी समितीत मंजुरी मिळाल्यानंतर त्यावर सर्वसाधारण सभेत चर्चा झाली. तसेच काकासाहेब चव्हाण आणि अनिता इंगळे यांनी खडकवासला-डोणजे विस्ताराची उपसूचना देऊन सिंहगड आणि पानशेत परिसरातील वाढत्या पर्यटनाचा मुद्दा उपस्थित केला. या वेळी कात्रज-उंड्री आणि वाघोली-लोणीकंद मार्गावरही मेट्रोसाठी उपसूचना दिली. सभागृहाने सर्वच उपसूचनांना मंजुरी दिली असून, प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी सरकारकडे पाठविण्यात येणार आहे.
General Assembly approves metro expansion in suburbs




