Bhayandar Police Suicide : भाईंदर पोलीस दलात खळबळ! 25 वर्षीय पोलीस शिपायाची गळफास लावून आत्महत्या
•आई गावी गेल्यानंतर दुर्दैवी घटना, आत्महत्येचे कारण अस्पष्ट
1 मिनिट वाचन

•आई गावी गेल्यानंतर दुर्दैवी घटना, आत्महत्येचे कारण अस्पष्ट
भाईंदर :- मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयात कार्यरत असलेल्या एका तरुण पोलीस शिपायाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना गुरुवारी सकाळी घडली असून, आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या प्रकरणी भाईंदर पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
रीतीक चौहान (25 वय) असे आत्महत्या केलेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे. मूळचा नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील रहिवासी असलेला रीतीक, पोलीस भरतीनंतर भाईंदर पश्चिमेकडील बेकरी गल्ली येथे आपल्या आईसोबत भाड्याच्या घरात राहत होता. 2023 च्या पोलीस भरतीत त्याची निवड झाली होती आणि त्याची नियुक्ती भाईंदर पोलीस ठाण्यात झाली होती. मात्र, दोन दिवसांपूर्वी त्याची आई नाशिकला गावी गेली असताना त्याने गुरुवारी सकाळी हे टोकाचे पाऊल उचलले. या घटनेमुळे पोलीस दलातील सहकारी आणि कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. आत्महत्येच्या नेमक्या कारणांचा शोध पोलीस घेत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कांबळे यांनी दिली.




