मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
पुण्यातील मोकळ्या भूखंडांवर राडारोडा टाकल्यास ५ लाखांचा दंडसलग तिसऱ्या दिवशी अनधिकृत बांधकामांवर महापालिकेचा हातोडाभाजपकडून संघटन विस्ताराची रणनीती; ‘सेवादूत अभियाना’च्या प्रभावी अंमलबजावणीवर भररोहित पवारांना बावनकुळेंचा कडक इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील आरोपांवरून राजकीय वातावरण तापलेप्रत्येक जिल्ह्यात १००, तर विभागीय स्तरावर २५० विद्यार्थ्यांच्या क्षमतेची वसतिगृहे उभारणार; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहितीदुष्काळग्रस्त लोककलावंतांच्या मदतीसाठी ‘अर्बन तमाशा’; २२ नोव्हेंबरला कोथरूडमध्ये रंगणार लोककलेचा अनोखा आविष्कार

सलग तिसऱ्या दिवशी अनधिकृत बांधकामांवर महापालिकेचा हातोडा

आयुक्त नवलकिशोर राम यांच्या उपस्थितीत कोथरूडमध्ये कारवाई

Vikrant Kulkarni
Vikrant Kulkarni

2 मिनिट वाचन

सलग तिसऱ्या दिवशी अनधिकृत बांधकामांवर महापालिकेचा हातोडा
आयुक्त नवलकिशोर राम यांच्या उपस्थितीत कोथरूडमध्ये कारवाई

पुणे: पुणे शहरातील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांविरोधात पुणे महानगरपालिका प्रशासनाने कारवाईचा धडाका अधिक तीव्र केला आहे. महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत कोथरूड येथील सिटी प्राईड परिसरात इमारतींच्या फ्रंट मार्जिन, साईड मार्जिन तसेच खासगी जागांमधील अनधिकृत बांधकामांवर संयुक्त कारवाई करण्यात आली.

शहरातील मोकळ्या जागांचा वापर बाधित करणारी आणि वाहतूक व सुरक्षेस अडथळा ठरणाऱ्या नियमबाह्य बांधकामांवर प्रशासनाने थेट हातोडा चालवला आहे.

वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय, बांधकाम विकास विभाग आणि अतिक्रमण विभागाच्या संयुक्त पथकाने ही कारवाई पार पाडली. परिमंडळ क्रमांक तीनचे उपआयुक्त विजयकुमार थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त अस्मिता तांबे, बांधकाम विकास विभाग झोन सहाचे अधिकारी आणि अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला.

शहरभरात ७५ हजार चौरस फुटांहून अधिक बांधकामे हटवली

महापालिकेच्या अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाने प्रसिद्ध केलेल्या १९ नोव्हेंबरच्या अहवालानुसार, शहराच्या विविध भागांमध्ये मिळून एकूण ७५ हजार ५४० चौरस फुटांचे अनधिकृत कच्चे व पक्के बांधकाम निष्कासित करण्यात आले आहे.

नगर रोड, जुना मुंढवा, एफसी रोड, जंगली महाराज रस्ता, सिंहगड रोड, हडपसर, बिबवेवाडी आणि टिंबर मार्केट परिसरातही ही मोहीम राबविण्यात आली. या संपूर्ण कारवाईदरम्यान १० पथाऱ्या किंवा काऊंटर आणि अन्य ९३ अतिक्रमणांवर कारवाई करून संबंधित साहित्य जप्त करण्यात आले.

जेसीबी, यंत्रसामग्री आणि मोठ्या मनुष्यबळाचा वापर

महापालिकेच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, विविध ठिकाणच्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेसाठी १० जेसीबी, १० गॅसकटर, पाच ब्रेकर, ८० महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान आणि २५० बिगारी सेवकांची मदत घेण्यात आली. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने महापालिका पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचाही बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता.

महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार उपआयुक्त सोमनाथ बनकर आणि उपआयुक्त अविनाश सकपाळ यांच्या नियंत्रणाखाली ही मोहीम राबविण्यात आली.

फ्रंट व साईड मार्जिनमधील बांधकामांवर विशेष लक्ष

इमारतींच्या समोरील (फ्रंट मार्जिन) आणि बाजूच्या (साईड मार्जिन) आवश्यक मोकळ्या जागांमध्ये करण्यात येणारी नियमबाह्य बांधकामे हा सध्या महापालिकेसमोरील महत्त्वाचा प्रश्न बनला आहे. अशा अनधिकृत बांधकामांमुळे इमारतींमधील आवश्यक मोकळ्या जागांचा वापर बाधित होतो. तसेच अनेक ठिकाणी वाहनांची ये-जा आणि नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर अडचणी निर्माण होतात. या पार्श्वभूमीवर कोथरूडमधील सिटी प्राईड परिसरात झालेली संयुक्त कारवाई प्रशासनाच्या भूमिकेमुळे महत्त्वाची मानली जात आहे.

कारवाई नियमित सुरू राहणार; कायमस्वरूपी व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

शहरातील सार्वजनिक रस्ते, पदपथ आणि मोकळ्या जागा अतिक्रमणमुक्त ठेवण्यासाठी यापुढेही वारंवार आणि नियमितपणे कारवाई सुरू ठेवण्याचा निर्धार पुणे महापालिकेने व्यक्त केला आहे. प्रशासन मोहिमेची व्याप्ती आणि सातत्य कायम ठेवण्यावर भर देत असले, तरी एकदा बांधकामे हटविल्यानंतर त्याच ठिकाणी पुन्हा अतिक्रमणे होऊ नयेत, यासाठी प्रशासन कोणती कायमस्वरूपी देखरेख आणि नियंत्रण व्यवस्था उभारणार, हा प्रश्न शहराच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे.

शेअर करा
Vikrant Kulkarni

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper