भारती विद्यापीठ परिसरात सराईताकडून दोन पिस्तुले, दोन काडतुसे जप्त
पुणे, महाराष्ट्र मिरर : पुणे गुन्हे शाखेच्या युनिट दोनने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करून अभिलेखावरील गुन्हेगाराकडून दोन पिस्तुले आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली.
2 मिनिट वाचन

पुणे, महाराष्ट्र मिरर : पुणे गुन्हे शाखेच्या युनिट दोनने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करून अभिलेखावरील गुन्हेगाराकडून दोन पिस्तुले आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली. अथर्व सोपान मारणे (वय १९, रा. राजविलास कॉम्प्लेक्स, भारती विद्यापीठ, पुणे) असे ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव असून, त्याच्याकडून ८० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ नोव्हेंबर २०२६ रोजी युनिट दोनचे अधिकारी आणि अंमलदार पाहिजे, फरारी तसेच अभिलेखावरील गुन्हेगारांची तपासणी करीत होते. यावेळी पोलीस अंमलदार महेश मंडलिक आणि सर्जेराव सरगर यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चंद्रभागा चौकाजवळील महापालिकेच्या मैदानात एक तरुण अनधिकृतपणे अग्निशस्त्रे बाळगून फिरत आहे. या माहितीच्या आधारे पथकाने तातडीने छापा टाकून अथर्व मारणे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून दोन पिस्तुले आणि दोन काडतुसे असा एकूण ८० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियमाच्या कलम ३(२५) आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम ३७(१), (३) सह १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अथर्व मारणे हा अभिलेखावरील गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध आंबेगाव पोलीस ठाण्यात खुनाचा, तर सांगवी आणि चिखली पोलीस ठाण्यांत शस्त्र अधिनियमाच्या कलम ३(२५) अन्वये गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त (गुन्हे) गौहर हसन आणि सहायक पोलीस आयुक्त शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली, युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांच्या सूचनेनुसार करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक स्वप्निल लोहार, महिला पोलीस उपनिरीक्षक तेजश्री पवार, सहायक पोलीस उपनिरीक्षक शंकर नेवसे तसेच पोलीस अंमलदार महेश मंडलिक, सर्जेराव सरगर, नागनाथ राख, ओमकार कुंभार, संतोष टकले, शंकर कुंभार, आशिष यादव आणि साधना ताम्हाणे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper




