मुख्य मजकुराकडे जा

पुण्यातील शिवाजीनगर जिल्हा व सत्र न्यायालयाला पुन्हा बॉम्बची धमकी; संपूर्ण परिसर रिकामा, सुरक्षा यंत्रणा सतर्क

धमकीचा ई-मेल प्राप्त होताच पुणे बार असोसिएशनचे तातडीचे निवेदन; वकील, पक्षकार आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवले

Vikrant Kulkarni
Vikrant Kulkarni

2 मिनिट वाचन

पुण्यातील शिवाजीनगर जिल्हा व सत्र न्यायालयाला पुन्हा बॉम्बची धमकी
धमकीचा ई-मेल प्राप्त होताच पुणे बार असोसिएशनचे तातडीचे निवेदन; वकील, पक्षकार आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवले

पुणे :- पुण्यातील शिवाजीनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा ई-मेल आज (सोमवार, 23 नोव्हेंबर) प्राप्त झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून, खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण न्यायालय परिसर तात्काळ रिकामा करण्यात आला आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीशांना ई-मेलद्वारे माहिती; पुणे बार असोसिएशनकडून परिसर खाली करण्याचे आवाहन

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात बॉम्ब ठेवल्याचा संदेश ई-मेलद्वारे प्राप्त झाला. या गंभीर प्रकाराची माहिती तात्काळ प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश (PDJ) यांना कळवण्यात आली.

धमकीच्या संदेशाच्या पार्श्वभूमीवर पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष व कार्यकारिणीने तातडीचे निवेदन जारी केले. सर्व वकील बांधव, बार असोसिएशनचे सदस्य, न्यायालयीन कर्मचारी आणि परिसरात उपस्थित असलेल्या पक्षकार व नागरिकांनी कोणतीही घाई किंवा गोंधळ न करता तात्काळ न्यायालय परिसर खाली करून सुरक्षित ठिकाणी जावे, असे आवाहन करण्यात आले. तसेच, पोलीस प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची विनंतीही असोसिएशनने केली आहे.

न्यायालय, मेट्रो स्थानक, विमानतळ आणि महापालिकेनंतर पुन्हा न्यायालयाला लक्ष्य; सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

पुणे शहरातील महत्त्वाच्या सरकारी आणि सार्वजनिक आस्थापनांना बॉम्बच्या धमक्या मिळण्याचे सत्र सुरूच असल्याचे या घटनेतून पुन्हा समोर आले आहे. यापूर्वीही २ नोव्हेंबर रोजी शिवाजीनगर जिल्हा न्यायालय आणि मेट्रो स्थानकाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल आला होता, ज्यामुळे सुमारे पाच तास सखोल तपासणी मोहीम राबवण्यात आली होती.

याशिवाय, पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला धमकीचा फोन आला होता, तर पुणे महानगरपालिका आणि महापौर कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी ई-मेलद्वारे देण्यात आली होती. वारंवार येणाऱ्या अशा धमक्यांमुळे न्यायालयीन कामकाजात अडथळा निर्माण होत असून, सायबर पोलीस व सुरक्षा यंत्रणांची डोकेदुखी वाढली आहे.

शेअर करा
Vikrant Kulkarni

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper