मुख्य मजकुराकडे जा

पुणे महापालिकेच्या मेडिकल कॉलेजमध्ये नोकरीचा सौदा; 11 डॉक्टरांची प्रत्येकी 10 लाख रुपयांची फसवणूक

अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेजमधील कायमस्वरूपी प्राध्यापक भरतीच्या नावाखाली आर्थिक व्यवहार; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार

Vikrant Kulkarni
Vikrant Kulkarni

2 मिनिट वाचन

पुणे महापालिकेच्या मेडिकल कॉलेजमध्ये नोकरीचा सौदा
11 डॉक्टरांची प्रत्येकी 10 लाख रुपयांची फसवणूक

पुणे :- पुणे महापालिकेच्या अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेजमध्ये कायमस्वरूपी प्राध्यापक पदावर नियुक्ती करून देण्याच्या आमिषाने कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या 11 डॉक्टरांची प्रत्येकी 10 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे वैद्यकीय आणि महापालिका वर्तुळात खळबळ उडाली असून, पीडित डॉक्टरांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.

चार वर्षांपूर्वी सुरू झालेल्या कॉलेजमध्ये कायमस्वरूपी पदांसाठी 28 डॉक्टरांची निवड होणार होती; वर्ष उलटूनही 11 जणांची नियुक्ती रखडली पुणे महापालिकेने चार वर्षांपूर्वी अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज सुरू केले. सुरुवातीच्या टप्प्यात या महाविद्यालयात अध्यापनासाठी कंत्राटी पद्धतीने डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली होती.

एक वर्षापूर्वी या महाविद्यालयात कायमस्वरूपी प्राध्यापकांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यासाठी एमडी (MD) व एमएस (MS) पर्यंत शिक्षण घेतलेल्या 28 डॉक्टरांची निवड होणार होती. मात्र, या भरतीसाठी कंत्राटी डॉक्टरांकडून प्रत्येकी 10 लाख रुपये मागण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानुसार रक्कम दिल्यानंतरही वर्षभरात 11 डॉक्टरांची नियुक्ती होऊ शकलेली नाही.

पैसे परत न मिळाल्याने महापौरांकडे दाद मागितली, मात्र समाधानकारक उत्तर नाही; तीन डॉक्टरांविरोधात तक्रार दिलेले पैसे परत मागितल्यानंतरही ते न मिळाल्याने या 11 पैकी काही डॉक्टरांनी सुरुवातीला महापौरांकडे तक्रार केली; कारण महापौर हे या मेडिकल कॉलेजच्या ट्रस्टचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. तेथे दाद न मिळाल्याने अखेर पीडित डॉक्टरांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली.

तक्रारदार डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, पैसे गोळा करून पुढे देण्यासाठी एजंट म्हणून तीन डॉक्टर कार्यरत होते. डॉ. नानासाहेब भांगरे, डॉ. इरफान मुल्ला आणि डॉ. हेमंत वैद्य यांच्या विरोधात तक्रार देण्यात आली असून, या संपूर्ण प्रकरणाचा तपास आता पोलिसांकडून सुरू आहे.

शेअर करा
Vikrant Kulkarni

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper