मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
चार वर्षांनंतर पी. व्ही. सिंधू जागतिक क्रमवारीत अव्वल ५ मध्येपाकिस्तानला हरवत भारताचा ऐतिहासिक विजय पटकावले चॅम्पियनशिपचे विजेतेपदरोलर स्केटिंग स्पर्धेत ध्रुव ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थिनींची सुवर्णभरारीआयपीएलमधील धोनीची खेळाडू म्हणून एक्झिट; आता चेन्नई सुपर किंग्जच्या मार्गदर्शकाची जबाबदारीस्वान फाऊंडेशनचे अध्यक्ष शशिकांत कांबळे यांना संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेसाठी निमंत्रणएफसी रोडवरील अतिक्रमणधारकांचा माल पार्किंगमध्ये लपवणे ठेकेदाराला भोवले, आयुक्तांची मोठी कारवाई

एकनाथ शिंदेंना पालघरमध्ये भाजपचा मोठा धक्का; माजी आमदार श्रीनिवास वनगा यांचा भाजपमध्ये प्रवेश

धनुष्यबाण सोडून हाती घेतले कमळ; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश, पालघरच्या राजकारणात नव्या घडामोडींना वेग

स्मिता कुलकर्णी
स्मिता कुलकर्णी

2 मिनिट वाचन

आमदार श्रीनिवास वनगा यांचा भाजपमध्ये प्रवेश
आमदार श्रीनिवास वनगा यांचा भाजपमध्ये प्रवेश

पालघर : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला पालघर जिल्ह्यात मोठा राजकीय धक्का बसला आहे. शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार श्रीनिवास वनगा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात 'ऑपरेशन टायगर ३.०'ची चर्चा सुरू आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या छायाचित्रासह 'वेट अँड वॉच ३.०' असा मजकूर असलेले पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर शिंदे गटाकडून पुन्हा राजकीय हालचाली होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, या चर्चेदरम्यानच भाजपने श्रीनिवास वनगा यांना पक्षात घेत शिंदे गटाला धक्का दिला आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे क्रीडा महोत्सवाच्या निमित्ताने गुरुवारी पालघर दौऱ्यावर आले होते. याच दौऱ्यादरम्यान श्रीनिवास वनगा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. २०२४ पासूनच ते शिंदे गटावर नाराज असल्याची चर्चा होती. अखेर त्यांनी शिवसेनेचे धनुष्यबाण सोडून भाजपचे कमळ हाती घेतले. त्यांच्या या निर्णयामुळे पालघर जिल्ह्यातील शिंदे गटाच्या राजकीय ताकदीला धक्का बसल्याचे मानले जात आहे.

काय म्हणाले श्रीनिवास वनगा?

काही वर्षांपूर्वी झालेल्या राजकीय घडामोडींमुळे आपण भरकटलो होतो. मात्र, कार्यकर्ते आणि कुटुंबीयांची इच्छा पुन्हा स्वगृही परतण्याची होती, असे श्रीनिवास वनगा यांनी पक्षप्रवेशावेळी सांगितले. माजी खासदार चिंतामण वनगा आज हयात असते, तर आपल्या या निर्णयामुळे त्यांना आनंद झाला असता, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

आपल्याला कोणत्याही पदाची अपेक्षा नसून सामान्य कार्यकर्ता म्हणून भाजपसाठी काम करण्याची इच्छा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच खासदार डॉ. हेमंत सावरा यांच्या कामाचे कौतुक करत भाजपच्या माध्यमातून पालघरमधील विकासकामांना अधिक गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

श्रीनिवास वनगा यांच्या भाजप प्रवेशामुळे पालघर जिल्ह्यात भाजपची ताकद वाढण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, शिंदे गटासाठी हा प्रवेश राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा धक्का मानला जात असून, आगामी काळात जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये काय बदल होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शेअर करा
स्मिता कुलकर्णी

बातमीदार-उपसंपादक

महाराष्ट्र मिरर