मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
बसमधील गर्दीचा फायदा घेत ७३ वर्षीय महिलेची सोन्याची बांगडी चोरीलानॉर्थ मेन रस्त्याच्या रुंदीकरणासाठी २१.४ कोटींचे भूसंपादनएमपीएससीच्या नऊ परीक्षांतील गैरव्यवहारांच्या चौकशीसाठी मुदतवाढ; २३ नोव्हेंबरपर्यंत निवेदने सादर करा'जिजाई'वर पार्थ पवारांची आमदारांसोबत खलबतेआळंदी जवळील गावात अखेर पिंजऱ्यात बिबट्या जेरबंदजागतिक नेमबाजी स्पर्धेत विवान कपूरची रौप्य भरारी; भारताला लॉस एंजेलिस ऑलिम्पिकचा कोटा!

अजितदादांबद्दल प्रचंड सहानुभूती; मात्र पक्षातील नेतेच काड्या करतात! मनोज जरांगे पाटलांचा राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठा दावा

सुनेत्रा पवार आणि शरद पवार गटातील राजकीय घडामोडींवर भाष्य; मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारलाही सुनावले

स्मिता कुलकर्णी
स्मिता कुलकर्णी

2 मिनिट वाचन

मनोज जरांगे पाटलांचा राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठा दावा
मनोज जरांगे पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चेने राज्यातील राजकीय वातावरण तापले असतानाच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी या विषयावर महत्त्वपूर्ण विधान केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल आपल्याला प्रचंड सहानुभूती असल्याचे सांगतानाच, त्यांच्या पक्षातीलच दोन-तीन नेते विलीनीकरणाच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण करत असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या अंतर्गत राजकारणावर भाष्य करण्याबरोबरच मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्य सरकारवरही जोरदार निशाणा साधला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे एकत्रीकरण होणार की नाही, याबाबत सध्या राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू आहेत. सुनेत्रा पवार यांच्या गटातील काही नेत्यांकडून विलीनीकरणाबाबत वेगवेगळी भूमिका मांडली जात आहे. दुसरीकडे, खासदार सुप्रिया सुळे यांनी विलीनीकरणाच्या चर्चेवर स्पष्ट भूमिका मांडली आहे. या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील म्हणाले, "अजितदादांबद्दल प्रचंड सहानुभूती आहे. मात्र, त्यांच्याच पक्षातील दोन-तीन जण काड्या करतात." तसेच शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाशी आपला काहीही संबंध नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगे यांनी सरकारला पुन्हा एकदा लक्ष्य केले. मराठा आरक्षण आणि प्रमाणपत्रांच्या लढ्याशी आपण प्रामाणिक असल्याचे सांगत हैदराबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्रे देण्याच्या प्रक्रियेत सरकारकडून अडथळे आणले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. सातारा आणि औंध गॅझेट लागू होऊ नयेत, यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू असल्याचा दावाही त्यांनी केला.

यावेळी राज्य सरकारच्या कारभारावर टीका करताना त्यांनी, "माणुसकी आणि नीतिमत्ता सोडलेले सरकार आजपर्यंत पाहिले नाही. सत्तेसाठी ईडी आणि चौकशीचा वापर करणारे हे पहिलेच सरकार आहे," अशी टीका केली. तसेच चर्चेत असलेल्या ५०० कोटी रुपयांच्या कथित ऑडिओ क्लिप आणि व्यवहाराच्या मुद्द्यावरही त्यांनी भाष्य केले. समाजाने आपल्याला वेड्यात काढू नये, यासाठी सरकारला वेळ देत असल्याचे विधान त्यांनी केले. या प्रकरणावरून शिंदे गटाच्या शिवसेनेलाही त्यांनी सवाल उपस्थित केले.

दरम्यान, धाराशिव जिल्ह्यातील येडशी येथे करंडे कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाल्याच्या दुर्घटनेवरही जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली. या घटनेत कुटुंबातील एकमेव बचावलेल्या कृष्णाला आई-वडील आणि भाऊ-बहिणीचे छत्र पुन्हा मिळणार नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. तसेच या दुर्घटनेला अग्निशमन विभागाचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा आरोप करत जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

शेअर करा
स्मिता कुलकर्णी

बातमीदार-उपसंपादक

महाराष्ट्र मिरर