मुख्य सामग्री पर जाएँ

RMC : पुण्यात वीकेंडला आरएमसी मिक्सर वाहनांना प्रवेश; कॅमेरा, मद्यतपासणीसह कडक सुरक्षा नियम

पुणे, महाराष्ट्र मिरर

धओ
धनश्री ओटारी

2 मिनट पठन

RMC

RMC : शनिवार-रविवारी आरएमसी मिक्सर वाहनांना शहरात प्रवेशाची मुभा

पुणे, महाराष्ट्र मिरर

RMC : शहरातील सुरू असलेल्या बांधकाम प्रकल्पांना दिलासा देण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनी रेडी-मिक्स काँक्रीट (आरएमसी) मिक्सर वाहनांसाठी प्रायोगिक तत्त्वावर वाहतुकीत शिथिलता जाहीर केली आहे. या निर्णयानुसार शनिवार आणि रविवार या दिवशी सकाळी ६ ते सायंकाळी ५ या वेळेत आरएमसी मिक्सर वाहनांना पुणे शहराच्या हद्दीत, रेड झोनसह, प्रवेश करून वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे. हा आदेश वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी जारी केला आहे. rmc mixer weekend traffic rules pune 

शहरात वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर अवजड वाहनांच्या प्रवेशावर यापूर्वी निर्बंध घालण्यात आले होते. मात्र, या बंदीचा परिणाम बांधकाम क्षेत्रावर होत असल्याची बाब समोर आल्यानंतर आरएमसी मिक्सर वाहनांसाठी मर्यादित स्वरूपात शिथिलता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे बांधकाम साहित्याचा पुरवठा वेळेत होण्यास मदत होणार असून विकासकामांचा वेगही कायम राहणार आहे.

MS-CET : बोगस गुण, लाखांचे ‘पॅकेज’ अन्… ; शिक्षण व्यवस्थेचा बोजवारा!

वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, ही सवलत केवळ आरएमसी मिक्सर वाहनांसाठी लागू असून इतर अवजड किंवा संथगतीने धावणाऱ्या वाहनांवरील निर्बंध कायम राहतील. त्यामुळे हायवा डंपर, ट्रक, जेसीबी, रोड रोलर, ट्रॅक्टर तसेच इतर बांधकाम यंत्रसामग्रीला या आदेशाचा लाभ मिळणार नाही. या वाहनांसाठी पूर्वीचे वाहतूक नियम आणि वेळापत्रकच लागू राहणार आहे. RMC

सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य

आरएमसी मिक्सर वाहनांना शहरात प्रवेश देताना वाहतूक पोलिसांनी कठोर सुरक्षा नियमही लागू केले आहेत. प्रत्येक मिक्सर वाहनावर ३६० अंश कॅमेरा, मागील बाजूस बॅक कॅमेरा आणि रिव्हर्स पार्किंग सेन्सर यापैकी आवश्यक सुरक्षा उपकरणे बसविणे अनिवार्य करण्यात आले आहे. जर ही उपकरणे उपलब्ध नसतील, तर वाहनासोबत क्लिनर किंवा चालक सहाय्यक ठेवणे बंधनकारक असेल, जे वाहन मागे घेताना किंवा गर्दीच्या भागातून जाताना चालकाला मदत करतील.

PMC : पुणेकरांचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद; जाणून घ्या कोणत्या भागात येणार नाही पाणी

याशिवाय प्रत्येक आरएमसी प्लांटमध्ये ब्रेथ ॲनालायझर (मद्यतपासणी यंत्र) ठेवणे अनिवार्य करण्यात आले आहे. प्लांटमधून वाहन बाहेर पडण्यापूर्वी चालकाची मद्यप्राशन तपासणी करणे बंधनकारक असेल. मद्यप्राशन केलेल्या चालकाला वाहन चालविण्यास परवानगी दिली जाणार नाही. या उपाययोजनांमुळे रस्ते सुरक्षित ठेवण्यास आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्यास मदत होईल, असा विश्वास वाहतूक पोलिसांनी व्यक्त केला आहे.

हा आदेश प्रायोगिक स्वरूपात लागू करण्यात आला असून त्याच्या परिणामांचा नियमित आढावा घेतला जाणार आहे. शहरातील वाहतुकीची स्थिती, सार्वजनिक हित, अपघातांचे प्रमाण आणि प्रशासकीय गरजांचा विचार करून आवश्यकतेनुसार या आदेशात बदल किंवा सुधारणा केली जाऊ शकते. परिस्थितीनुसार ही शिथिलता कायम ठेवायची की मागे घ्यायची, याचा निर्णय पुढील काळात घेतला जाणार आहे. RMC

नियमभंग केल्यास कठोर कारवाई

वाहतूक पोलिसांनी सर्व कंत्राटदार, विकासक, वाहनमालक, वाहतूकदार आणि चालकांना नव्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोटार वाहन कायदा, महाराष्ट्र पोलीस कायदा तसेच इतर लागू कायद्यांनुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे. RMC

PMC: मंजूर १३ पैकी ८ पदे रिक्त; पुण्याच्या शासकीय बालरुग्णालयांची अवस्था रामभरोसे

या निर्णयामुळे एका बाजूला शहरातील महत्त्वाच्या बांधकाम प्रकल्पांना आवश्यक असलेल्या काँक्रीटचा पुरवठा सुरळीत होणार असून दुसऱ्या बाजूला अत्याधुनिक सुरक्षा उपायांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेलाही प्राधान्य दिले जाणार आहे. विकासकामे आणि वाहतूक व्यवस्थापन यामध्ये समतोल साधण्याचा हा प्रयत्न असल्याचे वाहतूक विभागाने स्पष्ट केले आहे.

View this post on Instagram A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)

शेयर करें