मुख्य सामग्री पर जाएँ

Pune Flood : खडकवासलातून २७ हजार क्युसेक विसर्ग; महापौर मंजुषा नागपुरे पहाटेच 'अ‍ॅक्शन मोड'वर

पुणे, महाराष्ट्र मिरर

धओ
धनश्री ओटारी

2 मिनट पठन

Pune Flood

Pune Flood : पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी; नदीकाठच्या वस्त्यांना हायअलर्ट

पुणे, महाराष्ट्र मिरर

Pune Flood : खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे धरणाची जलपातळी झपाट्याने वाढली आहे. या पार्श्वभूमीवर, आज पहाटे ५.३० वाजल्यापासून मुठा नदीपात्रात तब्बल २७,२०३ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. ( Pune Flood )

नदीकाठच्या वस्त्यांमध्ये पुराचा धोका निर्माण झाल्याचे समजताच पुणे महानगरपालिकेच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी पहाटेच ‘अ‍ॅक्शन मोड’वर येत सिंहगड रस्त्यावरील एकता नगर, विठ्ठल नगर आणि शिवाजी नगर परिसराला प्रत्यक्ष भेट दिली. पूरपरिस्थितीचा आढावा घेत त्यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले, तसेच स्वतः माईक हातात घेऊन नदीकाठच्या वाहनांना सुरक्षित स्थळी हलविण्याच्या सूचना दिल्या. (pune flood mayor manjusha nagpure visit alert)

पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी; नदीकाठच्या भागांना हायअलर्ट

जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने धरणातून पाणी सोडण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. अचानक वाढलेल्या २७,२०३ क्युसेक विसर्गामुळे मुठा नदीने रौद्ररूप धारण केले असून, नदीकाठच्या सखल भागांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Pune Rain : कामं केलेल्या ८५ ठिकाणांचे थेट पावसातील फोटो दाखवा मंत्री मोहोळांकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती!

संभाव्य धोका लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि पुणे महानगरपालिकेने नदीकाठच्या नागरिकांना ‘हायअलर्ट’ जारी केला आहे. तसेच, नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये आणि पाण्याच्या प्रवाहाजवळ जाणे टाळावे, अशा कडक सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. (pune flood)

महापौरांची पहाटेच प्रत्यक्ष पाहणी आणि अधिकाऱ्यांना निर्देश

नेहमीच संवेदनशील प्रकरणांमध्ये तत्पर राहणाऱ्या महापौर मंजुषा ताई नागपुरे यांनी आज पहाटे विसर्गाची माहिती मिळताच थेट मैदानावर उतरण्याचा निर्णय घेतला. संभाव्य पूरबाधित क्षेत्र असलेल्या एकता नगर आणि विठ्ठल नगर भागाची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या व अडचणी जाणून घेतल्या.

महापौरांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून घटनास्थळावरूनच पुणे महानगरपालिकेच्या आणि जिल्हा प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. सखल भागातील पाणी उपसण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवणे, तात्पुरत्या निवारा केंद्रांची व्यवस्था करणे आणि औषधोपचार तसेच अन्नधान्याची कमतरता भासू न देणे, अशा प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने राबविण्याचे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले. (pune flood)

महापौरांनी स्वतः हाती घेतला माईक

नदीपात्रातील पाण्याची पातळी सातत्याने वाढत असतानाही, अनेक नागरिकांनी आपली वाहने सुरक्षित ठिकाणी हलवली नसल्याचे या पाहणीदरम्यान समोर आले. ही अत्यंत धोकादायक बाब लक्षात येताच, महापौर नागपुरे यांनी स्वतः हातात माईक घेतला.

हेही वाचा: Ashadhi Wari 2026 : पालखी सोहळ्यासाठी पुण्याच्या वाहतुकीत मोठे बदल

त्यांनी उद्घोषणा करत (लाऊडस्पीकरवरून) नागरिकांना आपली वाहने आणि मौल्यवान साहित्यासह तातडीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याचे आवाहन केले. महापौरांच्या या आवाहनानंतर स्थानिक प्रशासनाने आणि नागरिकांनी वेगाने हालचाली करत गाड्या बाजूला घेण्यास सुरुवात केली. (pune flood)

प्रशासनाचे नागरिकांना सहकार्याचे आवाहन

पाहणी दौऱ्यादरम्यान महापौरांसोबत स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांनी मांडलेल्या सूचनांची दखल घेत महापौरांनी संबंधित यंत्रणांना तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. पूरस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांनी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे आणि आवश्यकता भासल्यास सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे, असे आवाहन पालिकेमार्फत करण्यात आले आहे. सद्यस्थितीत आपत्ती व्यवस्थापन पथके घटनास्थळी तैनात असून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. (pune flood)

View this post on Instagram A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)

कोट
पुणे महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासन परिस्थितीवर २४ तास सातत्याने लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, केवळ अधिकृत सूत्रांकडून येणाऱ्या माहितीचे व सूचनांचे पालन करावे. पुणेकरांच्या जीवित व मालमत्तेच्या सुरक्षेसाठी पालिका प्रशासन पूर्णपणे सज्ज असून, कोणतीही आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

  • मंजुषा नागपुरे, महापौर, पुणे महानगरपालिका
  • शेयर करें